Thursday 28 February 2019

टाटा मेमोरिएल रूग्णालयाच्या आवारातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भातील कारवाईस गती द्यावी - प्रकाश महेता


मुंबई, दि. 28 : टाटा मेमोरियल रूग्णालयाच्या आवारात अनेक वर्षापासून असलेल्या झोपाडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात यावे. या भुखंडाचे पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्यासंदर्भातील कामांना गती द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास दिले.
आज मंत्रालयात अणुऊर्जा विभागांतर्गत येणा-या टाटा मेमोरिएल रूग्णालयाच्या आवारात अतिक्रमीत भूखंडाच्या पुनर्विकासासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री महेता बोलत होते. या बैठकीस गृहनिर्माण विभागाचे उपसचिव सु. बा. तुंबारे, अवरसचिव किशोर पठाडे, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रल्हाद महेशी, डिपार्टमेंट ऑफ ॲटोमिक एनर्जीचे निदेशक सौरभ बाबू, टाटा मेमोरिएल हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. कैलाश शर्मा, झोपडपट्टी सेवा संघाचे संदिप सावंत, सचिव शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.
श्री. महेता म्हणाले, या भूखंडाचा विकास करण्यासाठी दहा दिवसांच्या आत सर्व्हेक्षण करण्यासाठी टाटा मेमोरियल रूग्णालयाने ना हरकत परवानगी द्यावी. संबंधित भूखंड विकास करताना तेथे गेली ६० ते ७० वर्षे रहिवाशी असलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. संबंधित भूखंडाची विभागणी करून, रूग्णालय, झोपडपट्टी धारक आणि विकासकासाठी खुल्या विक्रिसाठी जागा देण्यासंदर्भातला आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्यात जास्तीत जास्त जागा ही टाटा रूग्णालयाच्या इमारतीसाठी देण्यात यावी. तसेच, त्याचे बांधकाम करून विनामुल्य ती सुपूर्त करण्यात यावी. संबंधित बांधकाम निविदा प्रक्रियेने विकासकास देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री. महेता यांनी आज सांगितले.
०००

No comments:

Post a Comment