Wednesday, 6 March 2019

स्वच्छ सर्वेक्षणात राज्याचा यंदाही गौरव मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे अभिनंदन



मुंबई, दि. 6 : स्वच्छ महाराष्ट्रासाठी जनतेने दिलेल्या सक्रीय सहभागामुळेच स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये राज्याने सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले असून त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेसह सर्व संबंधित घटक आणि यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.
देशातील स्वच्छतेच्या चळवळीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा मान मिळालेल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राने स्थान पटकावले आहे. सर्व राज्यांना मिळून देण्यात येणाऱ्या 198 पुरस्कारांपैकी 46 एवढे लक्षणीय पुरस्कार महाराष्ट्राने प्राप्त केले असून पश्चिम विभागासाठी असणाऱ्या 19 पुरस्कारांपैकी 13 पुरस्कारही राज्याच्या नावावर झाले आहेत. तसेच पश्चिम विभागातील आघाडीच्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 8 शहरांचा समावेश आहे, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. देशातील 500 हागणदारीमुक्त शहरांच्या निवडीत राज्यातील 150 नागरी संस्थांचा समावेश झाला आहे. तसेच कचरामुक्तीसाठी स्टार रेटिंग मिळालेल्या शहरांमध्ये राज्यातील सुमारे पन्नास टक्के म्हणजे 27 नागरी संस्थांचा महत्त्वाचा वाटा आहे. अमृत योजनेंतर्गत निवडलेल्या 100 शहरांत 29 तर अमृत व्यतिरिक्त इतर घटकांमधील 100 शहरांमध्ये राज्यातील 60 शहरांनी स्थान पटकाविले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विभागांतर्गत 100 शहरांमध्ये राज्यातील 83 नागरी संस्थांचा समावेश आहे.
-----000-----



1 comment:

  1. आपला महाराष्ट्रच सदैव पुढे आणी पुढेच.

    ReplyDelete