चाचा नेहरु बाल महोत्सवाचा बक्षीस वितरण कार्यक्रम
नागपूर, दि. 21: प्रत्येकाचेच बालपण हे छान आणि आनंदी असते. देशभर 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यासोबतच तो प्रत्येक क्षणी साजरा करावा, असे आवाहन राज्य बालसंरक्षण हक्क आयोगाच्या सचिव श्रीमती सिमा व्यास यांनी केले. बालमहोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून त्या बोलत होत्या.
बालदिन सप्ताह 2019 च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, मुंबई व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा बक्षीस वितरण सोहळा आज पार पडला.
यावेळी आयोगाच्या सदस्य डॉ. वासंती देशपांडे, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त एम. डी. बोरखडे, प्रशासकीय अधिकारी मंजुषा कुलकर्णी, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती अपर्णा कोल्हे दामोदर जोगी, कुमार मसराम, प्रा. श्रीराम सोनवणे, बालसंरक्षण हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, शशिकांत आगरकर, विनोद बोरकर यांची उपस्थिती होती. विभागांतर्गंत कार्यरत जिल्ह्यातील शासकीय, स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल अनाथ, निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्यात बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होणे आणि ती भावना वाढीस लागण्यासाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सचिव सीमा व्यास यांनी मुलांनी आयुष्यात अभ्यासासोबतच मैदानी खेळ, विविध स्पर्धांमध्ये भाग घेत व्यक्तिमत्त्व विकासाकडे अधिक लक्ष देण्याचे सांगितले. मैदानी खेळांमुळे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्रया सक्षम होतात. त्यातून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतल्यास विजय आणि पराभवातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडण्याचे काम केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व जडणघडणीत मोलाची भर पडते. तर अभ्यासातून त्यांच्या बुद्धिमत्ता वाढीस मदत मिळते, असे सांगत मुलांनी बालपण यथेच्छ आणि आनंदी जगण्याचे आवाहन केले.
यावेळी महिला व बालविकास विभागाच्या शासकीय मुलांचे बालगृहातील 10 वी व 12 वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गेलया सप्ताहाभर चाललेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी शासकीय मुले व मुलींच्या बालगृहातील विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करण्यात आले. त्यामध्ये नृत्य, गीतगायन, काव्यवाचन, वर्क्तृत्त्व, चित्रकला, निबंधस्पर्धा, कब्बड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, धावण्याची स्पर्धांमध्ये पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कविता इखार यांनी केले. कार्यक्रमात स्त्री भ्रूणहत्येवर विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करुन उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले. यावेळी महिला व बालविकास विभागअंतर्गंत चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील विविध बालगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
******
No comments:
Post a Comment