‘खेलो इंडिया’
स्पर्धेतील खेळाडूंना गौरविणार
नागपूर, दि. 27: क्रीडा
क्षेत्रामध्ये नागपूर शहराचा विकास व्हावा या दृष्टीने मानकापूर
स्टेडियममध्ये अधिक सुव्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने 123 कोटी रुपयांचा
प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविला आहे. 2020 मध्ये नागपूर शहर हे
मध्य भारतातील विकसित झालेले ‘स्पोर्ट हब’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास क्रीडा
व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली.
प्रेसक्लब येथे आयोजित ‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमामध्ये
पत्रकारांशी संवाद साधतांना श्री सुनील केदार बोलत होते.
श्री. केदार म्हणाले, तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धेतील
सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूस एक लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यास पंच्याहत्तर हजार
रुपये तर कास्य पदक विजेत्यास पन्नास हजार रुपये इतक्या रोख रकमेची पदक देवून एकूण
399 खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे.
तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा
स्पर्धेमध्ये 20 विविध खेळांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या
होत्या. या स्पर्धेत 19 खेळ प्रकारात राज्याचे 590 खेळाडू पात्र ठरले असून 171
पदाधिकारी मिळून एकूण 761 लोकांचे पथक सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी
होणाऱ्या व्यक्तीकरिता शासनाच्या वतीने खास बाब म्हणून देशांतर्गत विमान
प्रवासाकरिता व स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिराकरिता 83 लाख 55 हजार रुपयांचा निधी
उपलब्ध करुन दिला आहे. यापुढे देखील क्रीडापटूंना विविध सोयी-सवलती पुरविण्याबाबत
शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
भारत देश हा युवकांचा देश आहे. येथील युवकांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी शासनाच्या वतीने विशेष भविष्यकालीन
योजना निर्माण करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. क्रीडापटूंप्रमाणेच
क्रीडा कोचेस यांच्यासाठी देखील विशेष भविष्यकालीन योजना निर्माण करण्याबाबतचा
प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खेळाडूंकरिता दिलेल्या सर्व
सुविधा आणि सराव शिबीरे तसेच खेळाडूंच्या उत्तम कामगितीमूळे खेलो इंडियामध्ये
पदकांचा व्दिशतकीय आकडा यंदाही पार करता आला. याबाबत श्री. केदार यांनी खेळाडूंचे
तसेच कोचेसचे अभिनंदन करुन राज्यातील क्रीडा क्षेत्र यापुढे मोठी झेप घेईल, असा
विश्वास यावेळी व्यक्त केला.
*****
No comments:
Post a Comment