Monday, 27 January 2020

विभागस्तरीय कार्यशाळेतून अधिकाऱ्यांच्या क्षमता बांधणीवर भर - एकनाथ डवले

नागपूर, दि.27: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत इतर विभागांसोबत सांगड घालून अभिसरणाद्वारे विविध कामे घेण्यात येतात. त्या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीवर भर देण्यात येत आहे, असे रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले. मनरेगाच्यावतीने वनामती येथे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
कार्यशाळेला मनरेगा आयुक्त ए. एस. आर.नायक उपस्थित होते. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, गावात स्थायी स्वरूपाची मालमत्ता निर्माण व्हावी तसेच रोजगार मिळविण्यासाठी मजुरांना स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यायोजनेंतर्गत इतर विभागाशी सांगड घालून अभिसरणाद्वारे विभागस्तरावर शाळेला खेळाच्या मैदानासाठी संरक्षक भिंत बांधकाम करणे, साखळी कुंपण, छतासह बाजार ओटा, शालेय स्वयंपाकगृह निवारानाला बांधकाम, सार्वजनिक जागेवर गोदाम, सिंमेट रस्ता, डांबर रस्ता, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन, सामूहिक मत्स्यतळे येतात , असेही त्यांनी सांगितले.
                महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविताना उद् भवणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी व कामांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस सहआयुक्त प्रभाकर हेडाऊ, उपायुक्त मारोती चपळे, कार्यकारी अभियंता राजेंद्र अहिरे,  जी. के. राव तसेच  संजय उगेमुगे यांनी तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त श्रीमती  अंशुजा  यांनी केले.
                या कार्यशाळेत जिल्हास्तरीय तांत्रिक अधिकारी, कृषी अधिकारी व एम. आय. एस. समन्वयक उपस्थित होते.
***** 

No comments:

Post a Comment