Tuesday, 28 January 2020

गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी बँकांनी आर्थिक पाठबळ उपलब्ध करून द्यावे- उद्धव ठाकरे


मुंबई दि. 28 : राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ  उपलब्ध करून द्यावे असे आदेश काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सह्याद्री अतिथीगृहात यासंदर्भात विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांना बँकाकडून होणाऱ्या अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला. 
यावेळी  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आवाड, म्हाडाचे  उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर  यांच्यासह  अनेक बँकांचे प्रमुख उपस्थित होते.  यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे  अध्यक्ष रजनीशकुमार, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक  संजीव चढ्ढा, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अतनूकुमार दास, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी पालव मोहपात्रा, युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राज किरण राय आदींचा समावेश होता.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत ज्या प्रकल्पांचे काम मुंबईत सुरु आहे त्या प्रकल्पांना बँकांनी आर्थिक पाठबळ दिल्यास घर बांधण्याच्या तसेच  पुनर्वसनाच्या कामाला गती येऊन  सर्वसामान्य गरीब माणसाला त्याचे हक्काचे घर लवकर मिळण्यास मदत होईल. यादृष्टीने म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची स्वतंत्रपणे भेट घेऊन येत्या आठ दिवसात यासंबंधीचा सुनियोजित आराखडा तयार करावा. 
सर्वसामान्य माणसाच्या स्वत:च्या मालकीच्या, हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी शासन आग्रही असून त्यादृष्टीने अतिशय वेगाने घरांची उपलब्धता होणे, गृहनिर्माण क्षेत्राच्या पुनरुज्जीवनासाठी अर्थसहाय्य मिळणे आवश्यक आहे. हे असे क्षेत्र आहे ज्यातून राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळतांना अनेक रोजगार संधीही यातून निर्माण होतात. त्यामुळेच राज्य शासनही या क्षेत्राच्या विकासासाठी ठोस अशी पाऊले उचलत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
बँकांचा सकारात्मक प्रतिसाद
गृहनिर्माण क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने उचललेल्या पाऊलांचे स्वागत करून उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र गृहनिर्माण व  क्षेत्र विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या तसेच इतर  गृहनिर्माण प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
००००



No comments:

Post a Comment