Tuesday, 28 January 2020

जेवण आवडलं का? समाधानी आहात नां मुख्यमंत्र्यांनी केली विचारणा


साधला शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद
मुंबई दि. २८:  काय ताई, काय दादा,  जेवायला सुरुवात केली का,  जेवणाबाबत समाधानी आहात ना, जेवण ठीक आहे का, चव व्यवस्थित आहे ना,  जेवण आवडलं की नाही...   काही सुचना असल्या तर मनमोकळेपणाने सांगा,  अशी  विचारणा करतांना जर राज्याचा प्रमुख सावकाश जेवण्याचा  आग्रह करत असेल तर त्याहून मोठी गोष्ट कोणती ?
प्रजासत्ताक दिनी शिवभोजन योजनेचा राज्यात शुभारंभ झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  कोल्हापूर आणि नंदूरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. तेंव्हा हाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसत होता.  यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
साहेब एरवी जेवायला ५० रुपये लागायचे आता दहा रुपयात जेवण होते... तुम्ही शिवभोजन थाळी सुरु करून आमच्यासाठी खुप चांगली सोय केली बघा,   नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार  समितीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या योगेश शिंदे यांनी जेवता जेवता आपली प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांना सांगितली. थेट आमच्याशी बोलून आमची चौकशी करत असल्याबद्दलचा आनंद ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, केंद्राचे सचिव योगेश अमृतकर यांच्याशीही मुख्यमंत्री बोलले, केंद्रातील सुविधा आणि येणारा अनुभव मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतला.
सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडल्यानंतर  दुपारची जेवणाची चांगली सोय झाल्याचे कोल्हापूरकरांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी रुद्राक्षी स्वंय महिला बचतगटाच्या अण्णा रेस्टारंटच्या अध्यक्ष राजश्री सोलापुरे यांच्याशी तसेच त्यांनी सुरु केलेल्या शिवभोजन केंद्रातील लोकांशी संवाद साधला.
गोरगरीब जनतेचे आशीर्वाद घेण्याचे काम तुम्ही करत आहात
 ही फक्त जेवण्याची थाळी नाही तर  सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची भूक भागवून त्यांचे आशीर्वाद घेण्याचे काम  तुम्ही करत आहात. अन्नदाता सुखी भव् ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे शिवभोजन योजनेत जेवण देतांना स्वच्छता, टापटीप, जेवणाचा दर्जा याकडे  विशेष लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्रचालकांना दिल्या.  शिवभोजन योजनेतील केंद्र चालकांची एक बैठक मुंबईत आयोजित करण्याची सुचना  त्यांनी विभागाच्या सचिवांना केली.
साहेब हा शासनाचा खुप अभिनव उपक्रम आहे, तुमची कल्पना खुप छान आहे. लोकांचा खुप चांगला प्रतिसाद आहे,  आतापर्यंत दररोज १५० थाळया गेल्या, या शब्दात   राजश्री सोलापुरे यांनी यावेळी आपला आनंद  व्यक्त केला. केंद्रात ७२ लोकांना जेवणास बसण्याची सोय असल्याची माहिती त्यांनी दिली. हॉस्पीटलच्या आवारात हे केंद्र सुरु झाल्याने गोरगरीब जनतेला या थाळीचा लाभ मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.  येथे जेवणासोबत लोणचं ही दिलं जात असल्याचे शिवभोजन थाळीचा आस्वाद घेणाऱ्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या कल्पनेतील शिवभोजन योजनेचा स्वीकार सहभागी दोन्ही पक्षांनी केला, योजनेचे स्वागत केले, त्याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.. सरकारला आजच म्हणजे २८ तारखेला सत्तेत येऊन दोन महिने पूर्ण झाले आहेत, या अल्पकाळात सर्वसामान्य जनतेसाठी केलेला हा संकल्प केवळ न राहता प्रत्यक्षात आल्याचा आनंद आहे, सरकार सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कटिबद्ध आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली.

योजनेची व्याप्ती वाढवावी लागेल- श्री. भुजबळ
शिवभोजन योजनेतील थाळीला प्रचंड प्रतिसाद मिळत असून याची मागणी खुप मोठी आहे, त्यामुळे भविष्यात योजनेची व्याप्ती वाढवावी लागेल असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले. गोरगरिब जनतेला याचा खुप लाभ होत असल्याचे सांगतांना त्यांनी केंद्र चालक अतिशय आस्थेने आलेल्या प्रत्येकाला जेवण देत असल्याची माहिती दिली.
दुपारी १२ वाजताच शिवभोजन केंद्रावर जेवणासाठी रांग लागते, एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभागाचे  प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली. शिवभोजन ॲपच्या माध्यमातून दररोज प्रत्येक जिल्ह्यातील योजनेचे लाभार्थी आणि इतर माहितीचा आढावा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
००००



No comments:

Post a Comment