Tuesday, 28 January 2020

उपराजधानीच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध - मुख्यमंत्री














मेट्रोच्या ॲक्वालाईनचे उद्घाटन


        नागपूर, दि. 28 :राज्यातील शहरांचा विकास होण्यासाठी पूरक पायाभूत सुविधांची उभारणी गतीने करण्यात येईल. विकासाच्या या प्रक्रियेत शहराची विशेष ओळख जपण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शहरातील मेट्रो ॲक्वालाईनच्या प्रसंगी केले. त्यासोबतच उपराजधानीच्या विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही ही त्यांनी दिली.
            नागपूर मेट्रोच्या एक्वा लाईनवरील रिच 3 मार्गावरील मेट्रोची प्रवासी सेवा नागरिकांसाठी आजपासून सुरु झाली. त्या मार्गिकेचे  व्हिडीओ लिंकव्दारे उद्घाटन करतांना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीनगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री व जिल्हा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर संदीप जोशी, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शहरांचा चेहरा कायम ठेवून विकास कामे करण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

            राज्यात ठाणे, पुणे, मुबई, नागपूर आदींसह  अन्य  शहरात  मेट्रोचा प्रकल्प सुरु  आहे.  नागपूरची मेट्रो ही माझी मेट्रो आहे. माझी या शब्दाने नागरिकांची जबाबदारी अधोरेखीत होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परस्पर सहकार्याने विकसनशील महाराष्ट्र घडवण्याचा मनोदय त्यांनी यावेळी  व्यक्त केला.
            मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामासोबत दुस-या टप्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवावा. ब्रॉडगेज मेट्रोच्या माध्यमातून सॅटलाईट शहरे म्हणून विकसित करण्यात येईल नागपूरसह विभागातील पायाभूत सुविधामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा केद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी सांगितले.
            नागपूर शहर देशाचे हृदयस्थान असून, हे जागतिक ख्यातीचे शहर झाले पाहिजे, यासाठी शासन म्हणून प्रयत्न करणार असे पालकमंत्री श्री. राऊत यांनी सांगितले. पर्यटन हे या शहराचे ग्रोथ इंजिन असून पर्यटन व रोजगारासाठी काम करणार असल्याची हमी त्यांनी दिली.
            गृहमंत्री श्री. देशमुख यांनी मेट्रोच्या पायाभरणीत सर्वांचा हातभार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईच्या धर्तीवर नागपुरातही नाईट लाईफ सुरू करता येईल, का याचा विचार सुरु आहे. महामेट्रोच्या टिमने केलेल्या कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
            नियोजित वेळेत महामेट्रोन काम केल्याचे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रोच्या दुस-या टप्प्यासाठी व ब्रॉडगेज मेट्रोसाठी राज्य शासन सकारात्मकतेने पुढाकार घेईल असे आश्वस्त केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपनगरांना जोडणारी मेट्रो सुरु झाल्यानंतर मेट्रोतील प्रवासी संख्या वाढेल. ब्रॉडगेज मेट्रोसाठी राज्य शासनाने प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची विनंती केली.
            देशात वेगवेगळया शहरात 925 किलोमीटर मेट्रोचे काम सुरु असून 680 किमीवर मेट्रो सुरु असल्याचे सांगितले. देशभरातील दळणवळण व विकासाच्या प्रगतीला मेट्रोमुळे वेग येत असल्याचे केंद्रीय आवास व शहरी कार्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले. पायाभूत सुविधांचा विकास हा प्राधान्यक्रम असल्याचे व त्या अनुषंगाने देशात पुढील पाच वर्षात 1600 किमीचे मेट्रोचे जाळे तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय गृहनिर्माण सचिव डी. एस. मिश्रा यांनी सांगीतले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत, संचलन श्वेता शेलगावकर तर  आभार सुनिल माथुर यांनी मानले.
क्वा लाइनचे वैशिष्ट्ये
नागपूर मेट्रोचा पूर्व-पश्चिम कॉरिडोर (रिच-4 व रिच-3) लोकमान्यनगर ते प्रजापतीनगर दरम्यान आहे. यापैकी रिच-3 (लोकमान्य नगर ते सीताबर्डी) 11 कि.मी. लांबीच्या मार्गाचे उदघाटन मंगळवारी होणार आहे. या मार्गवर एकूण 11 स्टेशन प्रस्तावित असून लोकमान्यनगर, बंसीनगर, वासुदेवनगर, रचना रिंग रोड, सुभाषनगर, अंबाझरी लेक व्ह्यू, एल डी स्क्वेअर, शंकरनगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी इंटरचेंज असे या सर्व स्टेशनची नावे आहेत. यापैकी लोकमान्य नगर, वासुदेव नगर, सुभाष नगर, इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झांसी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी असे एकूण 6स्टेशन प्रवासी सेवेसाठी सज्ज आहेत. अंबाझरी तलाव, गांधी सागर आणि नाग नदी या भागात असल्याने पूर्व-पश्चिम कॉरिडोरला एक्वा लाइन म्हणून संबोधल्या जाते. एक्वा लाइनवरील रिच-3 मार्ग सुरु होणार असल्याने या भागातील शैक्षणिक संस्थाने, औद्योगिक क्षेत्रे, निवासी वसाहती आणि या मार्गावर प्रवास करणा-या सह इतर सर्व नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
      
*******

No comments:

Post a Comment