Friday, 17 January 2020

‘जागो ग्राहक जागो’ मोहिमेंतर्गत चित्ररथाच्या उपक्रमाचे उद्घाटन

             
नागपूर, दि.17 :राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त समाजात सजगता निर्माण करण्यासाठी ‘जागो ग्राहक जागो’ या चित्ररथाच्या उपक्रमाचा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज येथे हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.  
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात  आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा उपक्रम सुरु करण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी श्रीकांत  फडके, अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ॲड. स्मिता देशपांडे, एच.पी.सी.एल. गॅस कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक मुकुंद जंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
 त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना श्री. फडके म्हणाले,  बाजारपेठेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादकाकडून विविध योजना सादर केल्या जातात. त्यातून अनेकदा  ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो. या पार्श्वभूमीवर ‘जागो ग्राहक जागो’ या चळवळीच्या माध्यमातून सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध आकर्षक जाहिराती नवनवीन आमिषे दाखवून ग्राहकांना बळी पाडत असतात. अशावेळी ग्राहकांनी बाजारपेठेत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन खरेदी करतांना सजगता ठेवावी. जिल्हा पुरवठा विभागातर्फे नवीन तंत्रज्ञान  उपयोगात आणून ग्राहकांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने स्विकाराव्यात. तक्रारी स्विकारण्याची पद्धत सुटसुटीत ठेवावी. महिला वर्ग वस्तू खरेदी करतांना विशेष चोखंदळ असतात त्यामुळे महिलांमध्ये जागो ग्राहक जागोबाबत जागरूकता निर्माण झाल्यास संपूर्ण कुटुंबास त्याचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.
ॲड. स्मिता देशपांडे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार राज्य व जिल्हा मंचाचे कामकाज, न्यायदान प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी व त्याचे निराकरण तसेच ग्राहक कायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
अनिल सवई यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे महत्व सांगून अन्न सुरक्षा कायदा, ई-पॉस मशिन, भेसळ तसेच वस्तूंचा दर्जा ठरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेबाबत माहिती दिली. भास्कर तायडे यांनी थेट विक्री करणाऱ्या कंपन्यांचे कामकाज तसेच वैधमापन शास्त्र यंत्रणेचे कार्य व यंत्रणेचे संगणकीकरणाबाबत  माहिती दिली. तसेच ग्राहकांचे विविध हक्क, निवडीचे स्वातंत्र्य त्याचप्रमाणे शेतकरी, प्रवासी, वीज ग्राहकांच्या तक्रारी व त्यांचे निवारण व उपाययोजना याबाबतही विस्ताराने  माहिती दिली.
श्रीमती रोशना रेवतकर यांनी सूत्रसंचालन तर भास्कर तायडे  यांनी आभार मानले. यावेळी ग्राहक संघटनेचे पदाधिकारी, निरीक्षक, वैधमापन शास्त्र, पुरवठा निरीक्षक, जिल्हा पुरवठा कार्यालय प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचासह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
*****  

No comments:

Post a Comment