Tuesday, 17 March 2020

आमदार निवासातील अलगीकरण केंद्रात परदेशातून आलेल्या 450 नागरिकांची सुविधा - डॉ. संजीव कुमार

* कोरोना विषाणूसंदर्भात आवश्यक उपाययोजना लागू
* केंद्रात दीड हजार नागरिकांची राहण्याची व्यवस्था शक्य
* विविध उपाययोजनांसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

नागपूर, दि. 17 : कोरोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुमारे दीड हजार नागरिकांची 14 दिवस कालावधीसाठी  वास्तव्याची सुविधा करण्यासाठी आमदार निवाससह शासकीय व इतर इमारतीमध्ये अलगीकरण केंद्र स्थापित करण्यात आले आहे.  त्यात आमदार निवास येथे 210 खोल्यांमध्ये सुमारे साडेचारशे  व्यक्ती राहू शकतील अशी सुविधा करण्यात आली असल्याची माहिती  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणूसंदर्भात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी  मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, पोलीस उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर, विक्रम साळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर आदी यावेळी उपस्थित होते.
देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार सातत्याने होत असून यावर दक्षता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत आवश्यक आहे. कोरोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस अलगीकरण केंद्रात (क्वारेन्टाईन सेंटर) राहणे बंधनकारक आहे. या ठिकाणी  आवश्यक सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या केंद्रात 15 प्रवाशांची सुविधा करण्यात आली आहे. दररोज येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना क्वारेन्‍टाईन केंद्रात आणण्याची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
अलगीकरण केंद्रात विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी  या केंद्रातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, आरोग्य विभाग  वितानतळ येथील अधिकारी  तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पूर्ण कराव्यात. या परिसरात पोलीस विभागांचे अधिकारी व कर्मचारी सुद्धा व्यवस्थेच्या दृष्टीने उपस्थित राहतील याचीही दक्षता घ्यावी.
 आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असून त्यादृष्टीने व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेण्यात येत असून त्यानुसार इतर शासकीय इमारतीमध्ये सुद्धा वाढ करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी  सांगितले. शहरातील नागरिकांना  आवश्यकतेनुसार होम क्वारेन्टाईन मध्ये ठेवण्यासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच होम क्वारेन्टाईन करण्यात आलेल्या व्यक्तीबाबत वेळोवेळी  आरोग्याबाबत पाठपुरावा करुन खबरदारी  घ्यावी  यासाठी  पोलीस  विभागाचे सुद्धा सहकार्य घ्यावे.
104 व्यक्तींच्या नमुन्यांचे तपासणी
कोरोना विषाणूसंदर्भात आज 16 संशयित व्यक्ती आज  दाखल झाले असून आजपर्यंत 131 संशयितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 16 व्यक्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असून आतापर्यंत 96 व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यापैकी 9 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत 104 व्यक्तींचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी 81 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना विषाणूसंदर्भात  केंद्र शासनाच्या  सूचनेनुसार 131 व्यक्तींचा पाठपुरावा सुरु आहे. तसेच 35 व्यक्तींना 14 दिवसाच्या पाठपुराव्यांतर्गत नोंदणीत आहेत.
विमानतळावर 22 प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात आली असून एकूण 1 हजार 4 व्यक्तींची स्क्रिनिंग करण्यात आली आहे.  7 प्रवाशांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून अलगीकरण केंद्रात एकूण 13 प्रवाशी  आहेत.
विविध उपाययोजनांसाठी नोडल अधिकारी
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या असून त्याअंतर्गत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची  नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुषंगाने आज आदेश जारी केले.
कोरोना विषाणूसंदर्भात आयसोलेशन वार्डांची निर्मिती तसेच अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष तसेच हेल्पलाईन 24 तास कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी  जबाबदारी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार, विदेशातून आलेले प्रवाशी त्यांचा पाठपुरावा सहाय्यक जिल्हा  आरोग्य अधिकारी डॉ. इनामदार, संभाव्य बाधित व्यक्तींची माहिती  तसेच संपर्क डॉ. नवघरे, पोलीस विभागासंदर्भातील आवश्यक सहाय्य व पथक नियुक्त करण्यात आले. उपायुक्त श्रीमती श्वेता खेडकर अलगीकरण केंद्राची व्यवस्था उपविभागीय अधिकारी  शेखर घाडगे, आमदार निवास व्यवस्था जनार्दन भानुसे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा व्यवस्थापन सहाय्यक प्रा. डॉ. खडसे, डॉ. मीनाक्षी सिंग व डॉ. सेलोकर, होम क्वारेन्टाईन डॉ. सरला लाड, डॉ. सेलोकर, जनजागृती  जिल्हा शल्य चिकित्सक, महानगरपालिका, रेल्वे, राज्य परिवहन, महसूल, आपत्ती प्रतिसाद दल, माहिती व जनसंपर्क. औद्योगिक सुरक्षा उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्था आदी विभागांचे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेवून मार्गदर्शक सूचना केल्यात.

****

No comments:

Post a Comment