अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्या
नागपूर, दि. 13: कोरोना विषाणूबाधित आज दोन रुग्णांच्या तपासणीत पॉझिटिव्ह आल्यामुळे विषाणूबाधित तीन रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
विभागात कोरोना विषाणूसंदर्भात प्रतिबंधक उपाय सुरु असल्यामुळे तसेच या विषाणूसंदर्भात जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे. जनतेनेही कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्वच्छता ठेवून काळजी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त यांनी केले आहे.
कोरोना विषाणूसंदर्भातील आतापर्यंत 80 संशयितांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 31 रुग्ण दाखल करण्यात आले असून, त्यापैकी आतापर्यंत तीन रुग्णांची तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. 39 नमुने तपासण्यात आले आहेत. तसेच 31 संशयितांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. सध्या 49 रुग्णांचा पाठपुरावा सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत असून, आजपर्यंत 771 प्रवाशांची तपासणी करण्यात आली असता कुणालाही लक्षणे आढळून आलेली नाहीत. विभागात प्रतिबंधक उपायांची विविध माध्यमाद्वारे नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष अभियान सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका तसेच आरोग्य विभागातर्फे केंद्र व राज्य शासनाच्या कोरोना विषाणूसंदर्भात राबवायच्या उपाययोजनाबाबत दिलेल्या निर्देशानुसार संयुक्तपणे प्रभावी व परिणामकारक कार्यवाही सुरु असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
****
No comments:
Post a Comment