Wednesday, 18 March 2020

कोरोना उपचार व नियंत्रणासाठी आरोग्‍य सेवा अधिक सक्षम करणार - अनिल देशमुख







                
नागपूर, दि. 18 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार सातत्याने वाढत असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना परिणामकारक राबवतांनाच यापुढे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सेवा अधिक बळकट व सक्षम करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात कोरोना उपचारासंदर्भात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भुषण कुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे डॉ. अजय केवलिया तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच प्रसार टाळण्यासाठी विविध यंत्रणांनी आवाहन म्हणून स्विकारतांनाच परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करावी. तसेच मार्गदर्शक सूचेनेनुसार त्यांना अलगीकरण केंद्रात चौदा दिवस वास्तव्याची सुविधा करावी. महसूल, आरोग्य तसेच इतर विभागांनी आमदार निवाससह शहरातील विविध इमारतीमध्ये विलगीकरण केंद्र तयार करुन केलेल्या व्यवस्थेसंदर्भात गृहमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
कोरोनाचा सामुहिक संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेवून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधेत वाढ करावी यासाठी व्हेंटिलेटरसह आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील. व्हेंटिलेटर खरेदीसाठी जिल्हा नियोजन समिती तर्फे आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन कक्ष अधिक सुसज्ज करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ इतर जिल्ह्यातूनही मागविण्यात यावे. अतितात्काळ असणाऱ्या आरोग्य सेवा वगळता कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणाला प्राधाण्य देण्याचे निर्देश देतांना गृहमंत्री म्हणाले की, ट्रामासेंटरसाठी असलेले 20 व्हेंटिलेटर तात्काळ सुरु करुन त्याचा वापर प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावा. हायरिस्क असलेले कोरोना संशयित रुग्ण तसेच साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेले डायबिटीज व इतर आजार असलेल्या संशयित नागरिकांना प्राधान्याने उपचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील सर्व गर्दीचे ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक स्वच्छ राहील तसेच गर्दी होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. जिल्हा परिषदेसह इतर कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सॅनिटायझर अथवा साबनाने हात स्वच्छ केल्यानंतरच प्रवेश देण्यात यावा. कुठेही अस्वच्छ वातावरण राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. असे निर्देश यावेळी गृमंत्र्यांनी दिले.
तुरुंगातील सर्व कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून नवीन आलेल्या कैद्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. सर्व प्रकारच्या दारु विक्रीवर प्रतिबंध असल्यामुळे या दुकानांच्या परिसरात अधिक स्वच्छता राहील यादृष्टिने तात्काळ नियोजन करावे. अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
नागपूर विभागात 369 नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये आज 47 नागरिकांचा समावेश आहे. सर्व नागरिक निरिक्षणांतर्गत असून 67 नागरिकांचा चौदा दिवसाचा निरिक्षण कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोना संदर्भात आतापर्यंत 123 नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 116 नागरिकांची तपासणी निगेटीव्ह आली आहे. तसेच निरिक्षणानंतर 122 नागरिेकांना सुटी देण्यात आली आहे.
कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या तपासणी किट, सेफ्टीकिट, ट्रिपल एअर मास्क आदी उपलब्ध असून विभागातील सर्व जिल्ह्यांना आवश्यकतेनुसार पुरविण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणीसाठी सुविधा उपलब्ध असून, विदर्भासह मध्य प्रदेशातूनही या व्हायरसची तपासणी केली जाते. तपासणीसाठी आवश्यक असलेल्या 450 कीट उपलब्ध असून आवश्यकतेनुसार कीट उपलब्ध राहतील याची दक्षता घेतांना ज्यांना या संसर्गाची लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी प्राधाण्याने पूर्ण करावी. आतापर्यत 199 व्हायरसची तपासणी पूर्ण झाली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही तपासणीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरु करण्याला प्राधाण्य असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
यावेळी विविध विभागातर्फे सुरु असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. 


No comments:

Post a Comment