जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे सातशे कुटुंबांना वाटप
नागपूर, दि. 17 : कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध
विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात
राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.
स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करुन त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या
700 किट खरेदी करुन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.
शासकीय
सेवेत असतानाही सामाजिक संवेदना असलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे निर्माण
झालेल्या बिकट परिस्थितीत मदतीचा हात देवून आपली संवेदशीलता जपली आहे. त्यात विभागीय
आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच
समाज कल्याण, विक्रीकर आदींचाही समावेश आहे.
‘लॉकडाऊन’च्या
संकटकाळात प्रशासकीय कामाची चौकटी ओलांडून समाजातील दुर्लक्षित, कष्टकऱ्यांना
सुखाचे चार घास मिळावे यासाठी अनेकजण पुढे
आले आहे. समाजातील शेवटच्या घटकातील एकही माणूस उपाशीपोटी झोपता कामा नये यासाठी
प्रशासन युद्ध पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत असून याला स्वयंसेवी संस्थांकडून
चांगला सहयोगग मिळत आहे.
या संकटकाळात विभागीय
आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मदतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी त्यांनी
अधिकाऱ्यांना साद घातली. त्याला प्रतिसाद देत महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग,
तहसिलदार प्रताप वाघमारे तसेच नितीन गोहणे, स्नेहल खवले यांनी सहकारी अधिकाऱ्यांना
आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला महसूल
नव्हेतर इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. गोळा झालेल्या
निधीमधून शासनातर्फे स्वस्त धान्य उपलब्ध होत असताना गरज राहते ती किराणा
सामानाची. ती पूर्ण करण्यासाठी तीन डाळी, तेल तिखट, मीठ, हळद आदी एक ते दीड महिना पुरेल एवढे साहित्य असलेल्या
किट 700 कुटुंबासाठी तयार करण्यात आल्या. या किटचे वाटप प्रियदर्शनी संघटना, समता
संघटना, कराडे मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ आदींच्या साहाय्याने थेट गरीब व
गरजूपर्यंत त्या वाटण्यात आल्या. हा उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीदिनी करण्यात आला.
महसूल, विक्रीकर, समाज
कल्याण, शिक्षण, माहिती आदी विभागातील अधिकाऱ्यांनी स्वत:च्या पगारातून तीन लाख
रुपये गोळा केले. मोलमजुरी करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबाची यादी तयार करण्यात आली.
यामध्ये ओंकार नगर, वंजारी नगर, रामटेके नगर, बेसा आदी भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबाचा समावेश आहे. सकाळी 9 वाजता तीन
वाहनाच्या माध्यमातून कुठलाही गाजावाजा न करता स्वयंसेवी संस्थांकडे ही मदत
सोपविण्यात आली व त्यांच्यामार्फत तिचे वाटप करण्यात आले.
****

No comments:
Post a Comment