* 20 लाख
हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार
* आवश्यकतेनुसार बियाणे व खते उपलब्ध
* कापूस व सोयाबीन पिकांना खरीपमध्ये प्राधान्य
* 5 लाख 85 हजार मेट्रिक टन खतांची उपलब्धता
नागपूर, दि. 17 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे सध्या ‘लॉकडाऊन’ची
परिस्थिती असली तरी शेतीच्या खरीप हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. विभागात
सरासरी खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना
पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक
रविंद्र भोसले यांनी आज दिली.
खरीप
हंगामासाठी कापूस सोयाबीन तूर, भात आदी पिकांचे नियोजन कृषी विभागतर्फे
जिल्हानिहाय करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध
असून त्यांच्या मागणीनुसार कृषीसेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊनच्या
काळात कृषी विभगातर्फे तालुका तसेच मंडळस्तरावर गांवनिहाय खरीप हंगामासाठी आवश्यक
असलेल्या बियाणे व खतांच्या पुरवठ्याबाबत
नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठीचे नियेाजन पूर्ण
केले असल्याची माहिती कृषी सहसंचालकांनी
यावेळी दिली.
खरीप
हंगामातील विविध पिकानुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस
पिकासाठी विभागात 6 लाख 72 हजार 387 हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून
यासाठी 36 लाख 72 हजार 87 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. विभागासाठी 39 लाख 22 हजार 443 क्विंटल बियाणे
खाजगी व सार्वजनिक कंपन्यांकडून उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीपेक्षा 2
लाख क्विंटल जास्तीचे बियाणे उपलब्ध आहे.
सोयाबीन
पिकांतर्गत खरीप हंगामात सरासरी 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन
करण्यात आले आहे. त्यासाठी 1 लाख 63 हजार 435 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून खाजगी व सार्वजनिक संस्थांकडून 1
लाख 17 हजार 027 क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. यासोबत शेतकऱ्यांकडे उपलब्ध
असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होणार आहे. तूर पिकांतर्गत 1 लाख 94 हजार 567
हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून त्यासाठी 11 हजार क्विंटल बियाण्यांची
आवश्यकता आहे. त्यानुसार विभागात बियाणे उपलब्ध असल्याची माहिती श्री. भोसले यांनी दिली.
भंडारा,
गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात भात पिकांची प्रामुख्याने लागवड
होत असल्यामुळे या पिकांतर्गत खरीप हंगामात 7 लाख 89 हजार 174 हेक्टर क्षेत्रावर
नियोजन करण्यात आले आहे. भात पिकासाठी 1 लाख 79 हजार 396 क्विंटल बियाण्यांची आवश्यकता
असून विभागात खाजगी व सार्वजनिक संस्थांकडून 2 लाख 76 हजार 845 क्विंटल बियाणे
उपलब्ध होणार आहेत. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या बियाण्यांचे
नियोजन पूर्ण झाले असल्याची माहिती श्री.
भोसले यांनी दिली.
कृषी
विभागातर्फे खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्यांचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले
आहे. वर्धा जिल्ह्यात 2 लाख 35 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कापूस, 1 लाख 25 हजार
250 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 65 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांचे नियोजन
करण्यात आले आहे.
नागपूर
जिल्ह्यात 2 लाख 25 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, 1 लाख हेक्टर क्षेत्रावर
सोयाबीन, 94 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर भात तसेच 65 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर
पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात 1 लाख 94 हजार 398 हेक्टर
क्षेत्रात भात, 12 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर तर 550 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे
नियोजन पूर्ण झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 080 हेक्टर क्षेत्रावर
भात तर 1 हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांचे नियोजन आहे.
चंद्रपूर
जिल्ह्यात 1 लाख 97 हजार 287 हेक्टर क्षेत्रावर कापूस, 1 लाख 80 हजार 193 हेक्टर
क्षेत्रावर भात, 49 हजार 750 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 43 हजार 605 हेक्टर क्षेत्रावर तुरीचे नियोजन आहे.
गडचरोली जिल्ह्यात 1 लाख 95 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर भात, 14 हजार 600 हेक्टर
क्षेत्रावर कापूस, 7 हजार 946 हेक्टर क्षेत्रावर तूर तर 1 हजार 500 हेक्टर
क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नियोजन पूर्ण
झाले आहे.
*****
No comments:
Post a Comment