Wednesday, 15 April 2020

दुध उत्पादकांकडील सर्व दुध खरेदी करा - सुनिल केदार


      नागपूर, दिनांक 15:  दुध उत्पादकांकडील सर्व दुध खरेदी करुन या दुधापासून दुधाची भुकटी  तसेच तत्सम दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वापरावे, अशा सूचना दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांनी आज दिल्यात.
            कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुधाचा वापर कमी होत असल्यामुळे दुध उत्पादकांकडून दुधाची खरेदी होत नाही. त्यामुळे शेतकरी व दुध उत्पादक  अडचणीत आहेत. जिल्ह्यातील सर्व दुध संकलित करण्याच्या दृष्टीने तात्काळ नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी श्री. केदार यांनी दिलेत. दुधापासून भुकटी तयार करण्याला प्राधान्य असल्याचेही  त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हल्दीराम, दिनशॉ, मदर डेअरी, अमूल, क्रिमलँड डेअरी (जर्सी) आदी दुध वितरण करणाऱ्या संस्था

तसेच संबंधित अधिकारी यांची संयुक्त बैठक श्री. केदार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती,  त्यावेळी ते बोलत होते.
            खाजगी दुग्ध संकलन संस्थांनी दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करावी. त्यापासून विविध पदार्थ तयार करुन या पदार्थांची  थेट घरपोच सेवा उपलब्ध करुन द्यावी. जेणेकरुन लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरपोच ताजे दुग्धजन्य पदार्थ माफक दरात उपलब्ध होतील. मदर डेअरीने उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता ताकाचे उत्पादन वाढवून शहरभर मदर डेअरीच्या गाड्या फिरवून विविध भागांमध्ये ताक पाऊचेसची विक्री करावी. होम डिलिव्हरी या काळाची गरज असून दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळाल्यास दुग्ध पदार्थाची विक्रीत निश्चितच वाढ होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नागपूर विभागातील खाजगी दुग्ध प्रकल्पांची माहिती प्रास्तविकेमध्ये प्रादेशिक  दुग्ध व्यवसाय अधिकारी हेमंत गडवे यांनी यावेळी दिली.
*****

No comments:

Post a Comment