Thursday, 16 April 2020

कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेचे ‘नागपूर मॉडेल’ प्रभावी


महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना 
समुह संसर्ग रोखण्यासाठी इन्सिडेंट रिस्पॉन्स टिम

            नागपूर, दि. 16: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या नागपूर मॉडेलमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक अतिशय कमी वेळेत शोधून त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून समुह संसर्गाची मोठी साखळी खंडीत करण्यास मदत होत आहे. या मॉडेलनुसार पालिकेने आतापर्यंत २५ लाखापेक्षा जास्त नागरिकांचे आरोग्य सर्व्हेक्षण करून त्यांची काळजी घेतली जात आहे. प्रतिबंधित झोनमध्येही दररोज वैज्ञानिक पद्धतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे. ज्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत.
            मार्च महिन्यात नागपूर शहरामध्ये कोरोनाचा पाचवा रुग्ण आढळताच पालिका प्रशासनाद्वारे अधिक सजगतेने कार्य सुरू करण्यात आले. कोणतीही विदेश प्रवासाची पार्श्वभूमी वा लक्षणे दिसत नसताना सदर रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासन अधिक सजग झाले. यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने नागपूर मॉडेल तयार करण्यात आले व त्यानंतर ते तात्काळ कार्यान्वित करण्यात आले आहे. या नागपूर मॉडेलनुसार समुहसंसर्ग रोखण्यासाठी अतिजलद कार्यवाहीची गरज लक्षात घेऊन त्यासाठी सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्या नेतृत्वाखाली  ४८ विशेष रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. लक्षणे असलेली व्यक्ती आढळल्यानंतर व त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्वरीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सिस्टीमद्वारे त्याच्या संपर्कातील लोकांचा विविध मार्गाने शोध घेऊन त्यांना पालिका विलगीकरण कक्षात आणण्याचे काम या टीमद्वारे करण्यात येत आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आढळताच अवघ्या तीन ते चार तासात त्याच्या संपर्कातील सर्वांना विलगीकरण कक्षात आणले जाते. विशेष म्हणजे सोमवारी (ता.१३) आढलेल्या १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ७९ जणांना तातडीने शोधून त्यांना पालिकेतर्फे क्वारंन्टाईन करण्यात आले. ही प्रक्रिया सर्वच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संदर्भात राबविण्यात येत आहे. 
            मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या नागपूर मॉडेलनुसार आतापर्यंत शहरातील लाख ४४ हजार ८०० घरांमधील २५ लाख ३४ हजार लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणानुसार ज्यांना लक्षणे आढळली त्यांचे घरीच विलगीकरण करण्यात आले. सर्वेनुसार ताप, सर्दी, कफ आदींच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यानुसार २३४७ जणांना कफ असल्याचे दिसून आले. या सर्वांना होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर १९४८ जण पूर्णपणे बरे झाले. उर्वरित ३९९ जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. याशिवाय क्षयरोग, कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब व अन्य हाय रिस्क रुग्णांचीही काळजी घेण्यात येत आहे. पालिकेतर्फे स्वयंस्फूर्तीने हे पाउल उचलण्यात आले आहे. या महत्वपूर्ण पुढाकारामुळे समुह संसर्गाची मोठी साखळी खंडीत करण्यासाठी मदत होणार आहे.
पालिकेतर्फे १५ हजार विलगीकरण क्षमतेची तयारी
            शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका प्रशासनातर्फे आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र शहरात जर संसर्ग वाढला किंवा संशयित रुग्णांची संख्या वाढली तर त्यांच्या विलगीकरणासाठीही तयारी पालिकेतर्फे केली जात आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास  १५ हजार जणांचे विलगीकरण करता येईल इतक्या क्षमतेची ही तयारी करण्यात आली असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील कोणत्याही व्यक्तीचे विलगीकरण घरी होउ दिले जात नाही. संशयितांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला तरी त्यांना सुट्टी न देता १४ दिवसानंतर दुसरा अहवाल घेउन तो निगेटिव्ह आल्यानंतरच सुट्टी देण्यात येते. अशा स्थितीत संपर्कात येणा-या या रुग्णांना घरी ठेवणे धोक्याचे असते. म्हणून त्यांना पालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवले जाते.
सील करण्यात आलेल्या भागात विशेष टीम तैनात
            कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागाच्या सीमा नियमानुसार सील करण्यात येतात व सदर भागातील सर्व नागरिकांना होम क्वारंन्टाईन केले जाते. या भागातील सर्व नागरिकांची आरोग्यविषयक दृष्टीने संपूर्ण माहिती घेऊन लक्षणे आढळलेल्यांवर तातडीने उपचार व्हावे यादृष्टीने सील केलेल्या सर्व भागात जलदगतीने सर्वे होणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेता यासाठी पालिकेद्वारे विशेष टिम तैनात करण्यात आली आहे. सतरंजीपुरा व मोमीनपूरा या भागाकरिता विशेष ३४९ टीम तैनात केल्या आहेत. या टिमला सर्व आवश्यक सुरक्षा साहित्य पुरविण्यात येत आहेत. टीमद्वारे करण्यात येणा-या सर्वेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात येत आहे.
            सील करण्यात आलेल्या भागामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीस जाउ दिले जात नाही व या भागातील व्यक्तीलाही बाहेर जाऊ दिले जात नाही. त्यामुळे समुह संसर्ग टाळण्यास मोठी मदत होत आहे. आतापर्यंत मनपातर्फे सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसर, गांधी-महाल झोन  मधील  बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२,  आसीनगर झोन अंतर्गत प्रभाग क्र. आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत प्रभाग क्र. मधील बहुतांश परिसर, सतरंजीपुरा झोन अंतर्गत दलालपूरा प्रभाग क्रमांक २१ आदी भाग सील करण्यात आले आहेत. 
*****

No comments:

Post a Comment