Thursday 29 October 2020

 


प्लाज्मा दान करावंच !

                   -रविंद्र ठाकरे

* प्लाज्मामुळे 58 कोरोना रुग्णांना लाभ

* जिल्हाधिकाऱ्यांनी केले प्लाज्मा दान

 

       नागपूर, दि. 29 : प्लाज्मा देणेही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी दान केलेला प्लाज्मा अत्यवस्थ वा गंभीर कोरोना रुग्णांना दिल्या जातो. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोनामुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

            मागील महिन्यात कोविड पॉझिटिव्ह झाल्यानंतर उपचारानंतर आता पूर्ण बरा झालो आहे. यादरम्यान शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारे प्रतिजैविके (ॲन्टिबॉडीज) तयार झाले. रक्तातील प्लाज्मा वेगळे करुन अन्य गंभीर कोविड रुग्णाला दिल्यास कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मदत करतात. त्यामुळे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जावून प्लाज्मा दान केला आहे. कोविडमधून बरे झालेल्या प्रत्येकाने प्लाज्मा दान करावे, असे रविंद्र ठाकरे यांनी  आवाहन केले आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्लाज्मा बँक प्लाटिना प्रोजेक्ट अंतर्गत ॲन्टिबॉडीज पॉझिटिव्ह झाल्यानंतर साधारणत: 28 दिवसानंतर प्लाज्मा दान करता येते. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 72 दात्यांनी प्लाज्मा दान केला आहे. यामुळे 58 अतिगंभीर कोरोना रुग्णांना प्लाज्मा देण्यात आला आहे.

            कोरोनामधील गंभीर रुग्णांसाठी  प्लाज्मा दान करण्याची ईच्छा व्यक्त केल्यानंतर ॲन्टिबॉडीजच्या तपासणीनंतर जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी आज ब्लड बँकेत जावून  प्लाज्मा दान केले. यामध्ये दोन बॅगमध्ये  प्रत्येकी 215 एमएल याप्रमाणे 430 एमएल प्लाज्मा दान केले. यावेळी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, डॉ. अविनाश गावंडे, प्लाज्मा बँक प्लाटिना प्रोजेक्टचे राज्याचे नोडल अधिकारी डॉ. मोहमद फझल तसेच ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. संजय पराते यावेळी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून राज्यात प्रोजेक्ट प्लॅटिना हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यात 21 प्लाज्मा बँक आहेत.आतापर्यंत राज्यात 1 हजार 480 प्लाज्मा बॅग संकलित झाल्या असून त्यापैकी 690 बॅग कोरोनाग्रस्त गंभीर आजारातील रुग्णांना देण्यात आल्या आहेत.

            प्लाज्मा दान करणे हे सध्याच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे. त्यामुळे कोरोनामधून मुक्त झालेल्यांनी प्लाज्मा अवश्य करावे. प्लाज्मा दिल्यामुळे  गंभीर आजार असलेल्यांचा जीव वाचविण्यात आपला हातभार ठरु शकतो.  प्लाज्मा देणेही रक्तदानासारखीच प्रक्रिया आहे. रक्तदानानंतर रक्ताचे शुद्धीकरण होवून प्लाज्मा वेगळा केला जातो.  रक्तातील उर्वरित आपल्या शरीरात सोडले जातात. हे एकाचवेळी होत असून अवघ्या दीड तासाच्या आत ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे कोविडमधून मुक्त झालेल्यांनी प्लाज्मा दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

*****

No comments:

Post a Comment