Monday 26 October 2020

 कोविडमुक्त झालेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांची सुविधा

                                                                                                -रविंद्र ठाकरे

 दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विभाग कार्यरत

 

      





    नागपूर, दि. 26 : कोरोना संसर्गाचा वेग मंदावत असला तरी जिल्ह्यात या आजारातून ची बाधा होवून बऱ्या झालेल्या  रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या रुग्णांच्या आरोग्यविषयक तक्रारीचे निराकरण व त्यावरील उपचारासाठी दत्ता मेघे आयुर्वेदीक कॉलेज येथे सुरु झालेली ‘कोविड पश्चात पुनर्वसन बाह्यरुग्ण विभाग’ नागरिकांना सहाय्यभूत  ठरुन दिलासादायक ठरणार आहे. नागरिकांनी या वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी   ठाकरे यांनी आज येथे केले.

                वानाडोंगरी येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथे उभारण्यात आलेल्या ‘कोविड पश्चात पुनर्वसन बाह्यरुग्ण विभागा’चे उद्घाटन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. दत्ता मेघे मेडिकल कॉलेज व शालिनीताई मेघे रुग्णालय व अनुसंधान केंद्रांचे कुलगुरु डॉ.दिलीप गोडे, दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीचे प्राचार्य सचिन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.आर.सिंग यावेळी उपस्थित होते.                

श्री. ठाकरे म्हणाले, कोविड -19 मुळे आज सर्वांची जीवनशैली बदलली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना बऱ्याचदा आरोग्य तक्रारी भेडसावतात. दीर्घकालीन खोकला, प्रचंड अशक्तपणा व यातून येणारे नैराश्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत या रुग्णांच्या आरोग्य तक्रारींवर उपचार व नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन, मानसिक रोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ या सर्वांचे एका छताखाली मार्गदर्शन रुग्णांना येथे मिळणार आहे. अतिदक्षता कक्षात राहिलेल्या रुग्णांना बरे झाल्यानंतर देखील अनेक शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. कोविड पश्चात करावयाचे उपचार यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. त्यानुसार येथे रुग्णांवर उपचार केले जातील. सामाजिक स्वास्थ्य कायम राखण्यास यामुळे नक्कीच मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले.

                प्रास्ताविकेत श्री. गोडे म्हणाले, कोविडची बाधा होवून गेलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी चेस्ट स्पेशालिस्ट, जनरल फिजिशियन, आहारतज्ज्ञ, मानसिक रोग तज्ज्ञांची सेवा येथे घेण्यात आली आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार यादिवशी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत येथे रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. बरेचदा कोरोना विषाणूने बाधित झाल्यानंतर खोकला, धाप लागणे, थकवा, छातीत दुखणे, स्नायूंमध्ये वेदना, वजन कमी होणे, बहिरेपणा, अर्धांगवायूचा झटका, हृदयविकाराचा त्रास आदी शारीरिक तक्रारी उद् भवतात. तसेच निराशाजनक वाटणे, झोपण्याचा त्रास, अस्वस्थता अशी लक्षणे जाणवल्यास तात्काळ मनोचिकित्सकाचे उपचार मिळणे गरजेचे आहे. येथे रुग्णांना या  सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. याचा रुग्णांना नक्कीच लाभ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

                डॉ. अजय लांजेवार, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रागिणी पाटील, जनरल फिजिशियन डॉ. विनायक शेगोकर तसेच दत्ता मेघे कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी येथील डॉक्टर्स, परिचारिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

******

No comments:

Post a Comment