पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक
नागपूर दि. 05 : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकरीता जिल्हयात 139 मतदार केंद्राची प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली असून राजकीय पक्षांना काही हरकती व सूचना असल्यास त्या 10 नोव्हेंबर पर्यंत कळवाव्यात. त्या आयोगाकडे पाठविण्यात येतील, असे जिल्हाधिकारी नागपूर तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. या निवडणुकीची कार्यप्रणाली विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे राहणार असून कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे कोविडग्रस्त रुग्णांना बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या निवडणूक प्रक्रियेत मास्क, सॅनिटायझर, हातमोजे व सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकारेपणे पालन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
भारत निवडणूक भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेसाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नागपूर विभाग मतदारसंघासाठी दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येत आहे.त्यानुषगांने निवडणुकीसंबंधी सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी निवडणूक हेमा बढे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर, काँग्रेसचे प्रशांत पाटील, भाजपाचे रमेश दलाल व अन्य पक्षांचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
उमेदवार व राजकीय पक्षांनी आदर्श आचार संहितेचे कोटेकोरपणे पालन करावे. 80 वर्षावरील मतदारांसाठी पोस्टल बॅलेट पेपरचा वापर करण्यात येणार आहे. कोरोनाग्रस्तांना मतदानासाठी 1 तासाचा वेळ देण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र भरतांना 2 लोकांना प्रवेश असणार असून प्रचारात 5 लोक सहभागी होवु शकतील. निवडणूक प्रचार चमुमध्ये 5 गाडया राहणार आहेत. मतदार केंद्रात मतदारांना पेन नेण्यास मनाई राहणार आहे. मतदानाच्या वेळी मतदारास प्रथम पंसती कळवावी लागेल अन्यथा मतदान अमान्य राहील याची नोंद मतदारांनी घ्यावी. या निवडणुकीत शासकीय किंवा अर्धशासकीय व्यक्तींना निवडणुकीचे काम करता येणार नाही. तसेच जिल्हयातील कोणत्याही लोकप्रतिनिधींना या प्रक्रियेत सहभाग घेता येणार नाही. मतदान केंद्राचे व्हिडिओग्राफी करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
राजकीय पक्षांनी आपले ई-मेल क्रमांक व दुरध्वनी क्रमांक कार्यालयास सादर करावे. त्यावर निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या सूचना व कार्यपध्दती कळविण्यात येईल.निवडणूक विषयक सर्व परवानग्या निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत होणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हरकती व सूचना सांगितल्या.
यानंतर नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक विषयक कार्यप्रणाली बाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
00000
No comments:
Post a Comment