Tuesday 22 December 2020

 

‘स्मार्ट’ प्रकल्पासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

·        पात्र संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

·        वैयक्तिक शेतकरी पात्र राहणार नाही

नागपूर दि. 22:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गंत ‘बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन’ म्हणजे स्मार्ट प्रकल्पाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला असून, त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र संस्थांनी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत ण्याचे आवाहन प्रकल्पाचे नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर यांनी केले आहे.

 राज्यात या प्रकल्पाची 2027 पर्यंत अंमलबजावणी करण्यात येणार असून, या प्रकल्पाला 11 विविध  अंमलबजावणी यंत्रणांसह जागतिक बँक सहाय्य करत आहे. लहान व सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्य साखळी विकासासाठी मदत करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यात येत असून, समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी माविमचे लोकसंचालित साधन केंद्र, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गटाचे प्रभाग संघ, प्राथमिक कृषी पतसंस्था स्मार्ट प्रकल्पामध्ये लाभार्थी असतील.

या प्रकल्पामध्ये उत्पादक –भागीदार उप प्रकल्प, बाजार संपर्क वाढ, धान्य गोदाम आधारित प्रकल्प, नाविन्यपूर्ण पूरक प्रकल्प व कापूस मूल्य साखळी विकास उपप्रकल्प समुदाय आधारित संस्था सहभागी होऊ शकतात. या संस्था शेतमाल, शेळ्या आणि परसबागेतील कुक्कुटपालन यांच्या मूल्य साखळी विकासाच्या प्रकल्पासाठी अर्ज करु शकतात. निवड झालेल्या प्रकल्पांना 60 टक्क्यांपर्यंत पायाभूत सुविधा निर्मिती व तांत्रिक सहाय्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येणार असून, www.smart-mh.org या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत. या प्रकल्पासाठी खरेदीदार म्हणून संस्थात्मक नोंदणीकृत खरेदीदारांनी प्रपत्र 5 भरावे. योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.   

 ****

No comments:

Post a Comment