Wednesday 16 December 2020

ऑनलाईन शस्त्रखरेदी करण्यास आता बंदी

   नागपूर, दि.16 : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, शॉपक्युज यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाईन पध्दतीने शस्त्र खरेदी करण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे ऑनलाईन शस्त्र खरेदी करावयाची असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कळवले आहे.

            वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील काही गंभीर गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली शस्त्रे ऑनलाईन पध्दतीने खरेदी केल्याचे लक्षात आले आहे. अशाप्रकारे ऑनलाईन माध्यमातून गुन्हेगारांना  शस्त्र सहजरित्या घरपोच उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्र विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

             या निर्बंधानुसार प्राणघातक शस्त्रांची 9 इंचापेक्षा जास्त लांबी आणि 2 इंचापेक्षा जास्त पात्याची रुंदी असणारे तीक्ष्ण शस्त्र बाळगणे हा कायदेशीर दखलपात्र गुन्हा आहे. अशा प्रकारे शस्त्रांची कोणी खरेदी करीत असल्यास संबंधित ग्राहकाची विस्तृत माहिती पोलिसांना देणे अनिवार्य आहे. त्यामध्ये खरेदी  करणाऱ्या व्यक्तीचे पूर्ण नाव  व पत्ता, मोबाईल नंबर ई-मेल आयडी, खरेदी केलेल्या शस्त्राचा प्रकार, शस्त्राचा फोटो, खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा पत्ता इत्यादी माहिती ऑनलाईन खरेदीची ऑर्डर आल्यानंतर नागपूर पोलिसांच्या ई-मेल आयडीवर (dcpcrime@nagpurpolice.in) द्यावी. तसेच ऑनलाईन शस्त्राची पोच झाल्यानंतर याबाबत वरील ई-मेल आयडीवर कळवावे. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती फौजदारी तसेच व इतर कारवाईस पात्र राहील, असे अमितेश कुमार यांनी कळवले आहे.

******

 

 

No comments:

Post a Comment