Friday 29 January 2021

पल्स पोलिओ मोहीम दीड लाखाच्यावर बालकांचे होणार लसीकरण नागपूर, दि. 29 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 31 जानेवारी 2021 ला राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 1 लाख 95 हजार 82 बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर यांनी दिली. पल्स पोलिओ लसीकरणाचा वयोगट 0 ते 5 वर्षाचा असून या बालकांना पोलिओ लसीचे डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात एकूण 2343 लसीकरण बुथ असून 5429 कर्मचाऱ्यांमार्फत पोलिओ लसीचे डोस देण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका दवाखाने, महानगरपालिका येथील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हास्तर एक दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच गाव पातळीवर आरोग्यसेवक, सेविका, आशा स्वयंसेविका ह्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. 31 जानेवारी रोजी होणाऱ्या लसीकरण मोहिमेतुन ग्रामीण भागात सुटलेल्या बालकांना 2 फेब्रुवारी पासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात 209 ट्रांझिट टिमद्वारे बसस्टॅंड, रेल्वेस्टेशन, धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी व 130 मोबाईल टिमद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्यात येणार आहेत. या मोहिमेमध्ये आपल्या 0 ते 5 वर्ष वयाच्या यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पोलिओ लसीकरण करुन घ्यावे व मोहिम शंभर टक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment