Friday 29 January 2021

‘ज्ञानज्योती’साठी जिल्ह्यातून चार शाळांची निवड - जिल्हाधिकारी नागपूर,दि. 29 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)अंतर्गंत राज्यातील 100 आदर्श शाळांच्या निवडीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्यामध्ये जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांचे राज्यस्तरासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले. जिल्ह्यात व्हीएसटीएफ- मिशन 100 आदर्श शाळा हे अभियान राबविण्यात आले असून, त्या अभियानाचा आढावा आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी चार शाळांची निवड केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर, श्रीमती माणिक हिमाणे, पी. के. बमनोटे, सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, विस्तार अधिकारी रमेश चरडे, अभियानाच्या जिल्हा कार्यकारी किरण भोयर, तालुका समन्वयक रुपेश जवादे, कैलास लोखंडे, अविनाश मानकर, अंकित देशमुख उपस्थित होते. पारशिवनी तालुक्यातील ढवळापूर येथील आदिवासी शाळा, भिवापूर तालुक्यातील मानोरा, आणि रामटेक तालुक्यातील सावरा या बिगर आदिवासी तसेच कुही तालुक्यातील वग येथील शाळेचा समावेश आहे. पारशिवनी आणि रामटेक तसेच कुही आणि भिवापूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी दुसऱ्या तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देवून निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी बैठकीत दिले. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या ‘व्हीएसटीएफ’च्या माध्यमातून राज्यातील दुष्काळ आणि दारिद्र्यता, शेतकर्ज, उत्पन्न वाढ, स्वच्छता, शैक्षणिक विकास, रोजगार, कुपोषण, आरोग्य, कोविड-19वर प्रतिबंध इत्यादी अन्य सामाजिक आव्हानांना तोंड देणाऱ्या 100 खेड्यांचे परिवर्तन घडविण्याच्या दृष्टिकोनातून या अभियानात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अ
भियानाच्या माध्यमातून ठोस उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून, त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानाची उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली असून, ही उद्दिष्ट्ये पूर्ण करणाऱ्या शाळांची निवड करण्यात आली आहे. राज्यातील एक हजार शाळांमधून 100 आदर्श शाळा निवडण्यात येणार असून, त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील चार शाळांचे प्रस्ताव राज्यस्तरावर पाठविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी सांगितले. या शाळांमध्ये भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण तसेच आनंददायी शिक्षण या निकषांचा समावेश आहे. ‍राज्य स्तर ते शाळास्तरापर्यंतचे प्रत्यक्ष नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन विविध उपक्रम राबविण्यासाठी 26 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान या अभियानात समाविष्ट उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शाळांची पाहणी व मूल्यांकन, गावसभेचे आयोजन, आदर्श शाळा विकास आराखडा, आराखड्यास अंतिम मंजुरी देणे, 10 मेंटार्सची निवड करणे आदी होत. हे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले जयंतीला आदर्श शाळा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. *******

No comments:

Post a Comment