Thursday 11 February 2021

खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करा - राज्यमंत्री बच्चू कडू
नागपूर, दि. 11: यवतमाळ जिल्ह्यातील (ता. बाभुळगाव) खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम मूळ प्रकल्प अहवालानुसार त्वरित पूर्ण करुन मौजा सरुळ गावाचे पुनर्वसन तातडीने करावे, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात श्री. कडू यांच्या अध्यक्षतेखाली खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, अमरावती जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादुरे, यवतमाळ प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणेश राठोड आदी यावेळी उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले, आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे. या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना बंदनलिका वितरण प्रणालीमार्फत लाभक्षेत्रातील 1 हजार 175 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल. यासाठी मुळ प्रकल्प अहवालानुसार खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्प त्वरित पूर्ण करावा. सरुळ गावाचे पुनर्वसन प्रस्तावित करुन मुळ प्रकल्प अहवालानुसार प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तातडीने सादर करावा. जेणेकरुन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. पूर्वी खर्डा प्रकल्पामध्ये सरुळ गावाचे पुनर्वसन प्रस्तावित होते. 1 हजार 175 हेक्टरमध्ये बाभुळगाव तालुक्यातील सात गावांना या सिंचनाचा लाभ मिळणार होता. प्रकल्पास 29 कोटी 16 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता 19 डिसेंबर 2006 ला प्राप्त झाली होती. त्यानंतर सरुळ गावाचे पुनर्वसन वगळून प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता सादर करण्याबाबत सूचना करण्यात आली होती. परंतु श्री. कडू यांनी सरुळ गावाचे पुनर्वसन करुन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा व्हावा यासाठी पूर्वीच्या मुळ प्रकल्प अहवालानुसार खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या. *****

No comments:

Post a Comment