Friday 26 February 2021

कोरोना वाढतोय...शनिवार-रविवार गरज नसेल तर घराबाहेर पडू नका -डॉ. नितीन राऊत 'मी जबाबदार ' मोहीम राबवा ; कोरोना प्रोटोकॉल पाळा नागपूर, दि. २५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी जबाबदार', मोहीम महाराष्ट्रात सुरू केली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज नागपूरमध्ये सध्या आहे. रुग्ण संख्या सतत वाढत असून कोरोना शहरात वाढत आहे. त्यामुळे शनिवार व रविवार या दोन दिवशी सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवावी. नागरिकांनी गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे आवाहन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. पालकमंत्र्यांनी आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अविनाश गावंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, , जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकर, मनपा उपायुक्त राम जोशी व कोविड टास्क फोर्सचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका क्षेत्र व नागपूर ग्रामीण क्षेत्रांमधील आरोग्यविषयक सोयी-सुविधांचा त्यांनी प्रामुख्याने आढावा घेतला. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये बेडची उपलब्धता, अतिदक्षता कक्ष, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धता, रक्तसाठ्याची उपलब्धता, मनुष्यबळाची उपलब्धता, कन्टेनमेंट झोनची सद्य:स्थिती, नियंत्रण कक्ष, रिअल टाईम बेड उपलब्धता, कोविड मित्राची तैनाती, आरोग्य पथकाच्या ग्रुप भेटीत झालेली वाढ, चाचण्यांची संख्या, सुपर स्प्रेडरच्या किती चाचण्या सुरू झाल्या, शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी द्यावयाच्या सूचना, जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या उपाय योजना, शनिवार-रविवार मार्केट बंद तयारी ठेवण्यासाठीच्या पूर्व तयारीसंदर्भातही आज सर्व विभागाकडून आढावा घेण्यात आला. महसूल, पोलीस, महानगरपालिका, प्रशासन, आरोग्य विभाग, शहरातील शाळा कॉलेजची सद्य:स्थिती, शहरातील खाजगी दवाखाने, तसेच मेयो व मेडिकलमधील आरोग्य विषयक स्थितीवरही यावेळी चर्चा झाली. नागपूर मध्ये सद्य:स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी चिंता करू नये मात्र सोबतच 'मी जबाबदार ' मोहीम प्रत्येक नागरिकांनी घराघरात पाळावी, जेणेकरून प्रत्येक घरातील व्यक्तीच्या आरोग्याचे रक्षण केले जाईल. या बैठकीनंतर पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला निर्देश दिले. यामध्ये उद्या शनिवार व रविवार नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने मॉल व गर्दीचे ठिकाण बंद ठेवण्याचे त्यांनी सांगितले. गरज नसेल तर कोणीही घराबाहेर पडू नये. मास्क न घालणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, चाचण्यांची संख्या सध्या तीनपट आहे. त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ करण्यात यावी. सुपर स्प्रेडर घटकांमध्ये हॉकर्सची तपासणी मोठ्याप्रमाणात करण्यात यावी. शाळा महाविद्यालये बंद असल्याबाबतची माहिती पालकांपर्यंत पोचविण्यात यावी. उद्योग समूहातील व व्यापारी प्रतिष्ठानमधील कामगारांचे लसीकरण करण्याची मोहीम आखण्यात यावी. पोलिसांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. मंगलकार्यालय, रिसॉर्ट बंद करण्यात आलेले आहेत. मात्र, घरी होणाऱ्या विवाहातील संख्येवर देखील नियंत्रण ठेवण्यात यावे, ज्या भागात ज्या बिल्डिंगमध्ये कोरोना बाधित आहे त्याच ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करण्यात यावे, महानगरपालिका व पोलीस विभागाने कन्टेन्मेंट झोन व रेस्टोरेंट हॉटेल्स यावरील बंदीसंदर्भात निश्चित धोरण करावे. रात्री उशिरा हॉटेल्स खानावळी सुरू राहणार नाही याबाबत धोरण आखावे, मेयो, मेडिकल याठिकाणी यापूर्वीच्या सर्व व्यवस्था बहाल करण्यात याव्या. हॉस्पिटलमधील मनुष्यबळ गरजेनुसार वाढवावे. डाटा एंट्री मध्ये सुसूत्रता आणावी. लक्ष्मी नगर,धरमपेठ, हनुमान नगर, या भागातील वाढीव रूग्ण संख्येवर तातडीने नियंत्रण मिळवावे, नागपूर ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या पुन्हा वाढवावी. प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच मोबाईल व्हॅन मार्फत चाचण्या व्हाव्यात, सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे कुठेच गर्दी जमणार नाही याची काळजी घ्यावी. या काळातील परीक्षांच्या ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले. ****

No comments:

Post a Comment