Friday 26 February 2021

‘स्मार्ट व्हिलेज'च्या धर्तीवर बिना गावाचे पुनर्वसन करणार - पालकमंत्री •मेकोसाबाग येथील भूखंड मालकी वाटप पट्ट्यासंदर्भात चर्चा • मिहान पुनर्वसनासंदर्भातील सुनावणी जलदगतीने घेण्याच्या जिल्हाधिका-यांना सूचना • मासे विक्री संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट नागपूर, दि. २६: रस्ते, वीज, पाणीपुरवठा, गडरलाईन, बगीचे आदि सर्व पायाभूत सोयी-सुविधांनी युक्त 'स्मार्ट व्हिलेज'च्या धर्तीवर बिना गावाचे पुनर्वसन करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांशी संबंधित आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मिहानचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, उपजिल्हाधिकारी जगदिश काटकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वेस्टर्न कोल्ड फिल्ड (वेकोलि)ने सीएसआर फंडामधून बिना येथील पायाभूत सुविधा निर्मितीसाठी पुढाकार घेत ही विकासकामे जलदगतीने पूर्णत्वास न्यावीत. राज्य शासन आवश्यकता असेल तिथे मदत करेल, असे सांगून डॉ.राऊत म्हणाले की, या गावाचे पुनर्वसन करताना जागेचे १२२ कोटी रुपये महानिर्मितीने वेकोलिला द्यावेत. येथून निघणारा कोळसा सामंजस्य करार करून कोराडी व खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र, महाजेनकोला नोटीफाइड दरानेच देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गतवर्षी नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे गावालगतचा काही भाग खचला असून, वेकोलिने सीएसआर फंडातून गावालगतही मातीचा भराव टाकावा. त्यामुळे पावसाळ्यात नदीच्या पुरामुळे धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी वेकोलि व राज्य शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी संयुक्त पाहणी करतील आणि पुढील सूचना देऊन कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. राऊत यांनी दिल्या. मेकोसाबागेतील ख्रिश्चन कॉलनी येथील भूखंडाच्या मालकी हक्काचे पट्टेवाटपासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. येथील जमिनीच्या काही भागावर प्लॉट पाडण्यात आले असून, ते नियमित करावेत, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. तसेच येथे असलेल्या चर्चला नोटीशी पाठवाव्यात, त्यानंतरही चर्चने जागा खाली करून न दिल्यास राज्य शासनाकडून करण्यात येणा-या कारवाईला सामोरे जावे. कारण नागपूर महानगरपालिकेला येथून कोणताही कर मिळत नसून, या जागेच्या शासनदरबारी नोंदी घेतल्यास महापालिकेला कर मिळेल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. मिहान प्रकल्पांतर्गंत शिवणगाव पुनर्वसनाबाबत घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सुनावण्या जलदगतीने घ्याव्यात तसेच त्या नोंदी घेऊन येथील पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी दिले. मासे विक्रेता संघाच्या शिष्टमंडळासोबत यावेळी चर्चा करण्यात आली असून, शहरातील मासे विक्रेत्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त असे गाळे रेल्वेस्थानकाजवळील परिसरात उपलब्ध करून द्यावेत. तसेच घाऊक विक्रेत्यांसाठी सर्व सोयीसुविधा ओट्यांची सोय करून देण्याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली. *****

No comments:

Post a Comment