Thursday 11 February 2021

शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक -अतिरिक्त समाज कल्याण आयुक्त दिनेश डोके नागपूर, दि. 11 : सामाजिक न्याय विभाग पाच स्तंभावर उभा आहे. या पाच विविध स्तंभांना बळकट केल्यास शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे सोयीचे होईल,असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिनेश डोके यांनी येथे केले. या उद्देशाने विदर्भातून कार्यशाळा सुरुवात करण्यात आली असून राज्यातील सर्व विभागात याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून कोविड महामारीमुळे प्रलंबित राहिलेली कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. विदर्भातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल, गृहप्रमुख व निवासी शाळेतील मुख्याध्यापकांसाठी आज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाच्या निरीक्षण शाखेच्या सहाय्यक आयुक्त मनिषा फुले, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, अमरावतीचे प्रादेशिक उपायुक्त श्री. विजय साळवे, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख प्रामुख्याने कार्यशाळेस उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागाच्या पाच स्तंभांपैकी एक असलेले अधीक्षक हे कार्यालय प्रमुख आणि कर्मचाऱ्यातील दुआ आहेत. अधिक्षकाच्या कार्यक्षमतेवर कार्यालय योग्य रितीने कार्य करते. समाज कल्याण निरीक्षक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून त्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य रितीने पोहचवितात. गृहपाल हा महत्वाचा घटक असून मागासवर्गीय मुले चांगली शिकू शकतील व त्यांचे जीवनमान उंचावता येईल यावर भर देतात. मुख्याध्यापकांनी तळागाळातील मुलांना चांगले शिक्षण दिले तरच समाज सुशिक्षित होईल. लेखा अधिकाऱ्यांनी निधीचा योग्य विनियोग केला तर योजना सफल होतील, असे श्री. डोके म्हणाले. या पाच स्तभांना कार्यशाळेद्वारे बळकट करुन विभागाने प्रभावीपणे योजनांची अंमलबजावणी करावी,असे त्यांनी सांगितले. या विभागाबद्दल लोकांचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बदलला पाहिजे तरच पारदर्शक व गतिमान कार्य विभागाला करता येईल. या कार्यशाळेद्वारे आपल्या अडचणी, सूचना यावर विचार करुन त्या शासनापर्यंत पोचविण्यात येणार आहोत. त्यावर एखादा शासन निर्णयसुध्दा तयार करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ. गायकवाड यांनी योजनांचा लाभ, प्रशासकीय बाबी,आर्थिक तरतूद, क्षेत्रीय तपासणी तसेच कार्यशाळेच्या आयोजनाबाबत माहिती विषद केली. कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाची आश्यकता असून त्याशिवाय कामाविषयी माहिती मिळत नसल्याचे श्रीमती फुले यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या अनुषंगाने प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत सादरीकरणाद्वारे कर्मचाऱ्यांनी नियोजन, सूचना तसेच अडचणी सादर केल्या. यात समाजकल्याण निरीक्षक श्री. हेडाऊ यांनी प्रशासकीय काम कमी केल्यास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येईल, असे सांगितले. गृहपाल प्रविण मडावी यांनी प्रवेश व प्रचलित प्रक्रिया याबाबत विचार व्यक्त केले. गोपाल खडासरे यांनी प्रशासनात आधूनिकीकरण व निधी मध्ये वाढ करण्याचे सांगितले. कार्यालय अधीक्षक राजेंद्र भुजाडे यांनी विभागाची रचना व कार्यपध्दतीवर प्रकाश टाकला. दुसऱ्या सत्रात अमरावती विभागाचे गृहपाल आर.जी. रकमे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत शासकीय इमारतीचे व्यवस्थापन, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला. तसेच कार्यपध्दती सॉफ्टवेअर अद्ययावत करुन विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. या कार्यशाळेत नागपूर- अमरावती विभागातील मोठया प्रमाणात कर्मचारी उपस्थित होते. 00000

No comments:

Post a Comment