Tuesday 15 June 2021

कृषी संजीवनी मोहिमेला 21 जूनपासून सुरुवात

नागपूर, दि. 15: आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम सुरु करण्यात येत आहे. राज्यात 21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत प्रत्येक कार्यालयीन दिवशी महत्वाचे तंत्रज्ञान व मोहिमांवर विशेष भर देवून प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी कळविले आहे. कृषी संजीवनी मोहिमेमध्ये 21 जून रोजी बी.बी. एफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान, 22 जून रोजी बिजप्रक्रिया, 23 जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, 24 जून रोजी कापूस ‘एक गाव एक वाण’, भात क्षेत्रात सुधारित भात लागवड, कडधान्य क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 28 जून रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, 29 जून रोजी तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढ करण्यासाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, 30 जून रोजी महत्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना व 1 जुलै 2021 रोजी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कृषी विद्यापीठाचे संशोधित व अद्ययावत तंत्रज्ञान या मोहिमेत प्रसारित करण्याचा मानस आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या महत्वाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. कृषी योजनांची माहिती व्हॉटस्ॲपवर मिळण्यासाठी Auto reply सुविधा विकसित करण्यात आली आहे. व्हॉटस्ॲपवर योजनेची माहिती मिळण्यासाठी 918010550870 या क्रमांकावर keywords असे टाईप केल्यास त्या योजनांची माहिती तात्काळ प्राप्त होईल. या Auto reply सुविधेचा सुद्धा या मोहिमेदरम्यान प्रसार, प्रचार करुन माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. www.youtube.com/agriculturedepartment Gom असे कृषी विभागाचे चॅनल आहे. या मोहिमेदरम्यान यू-टयुबवरील शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतर शेतकऱ्यांना दाखविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 00000

No comments:

Post a Comment