Monday 14 June 2021

स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करा -डॉ. नितीन राऊत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची पाहणी नागपूर, दि. 14 : स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तालुका क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा निर्माण कराव्या. येथे सिंथेटिक ट्रॅक, व्हॉलीबॉल कोर्ट तसेच लहान मुलांसाठी जलतरण तलावाची निर्मिती करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले. जरीपटका भागातील आहुजा नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची डॉ. राऊत यांनी पाहणी करून संबंधितांशी चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यासच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, तहसीलदार सूर्यकांत पाटील, क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड, अतिरिक्त तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, नागपूर सुधार प्रन्यासचे उत्तर विभागीय अधिकारी पंकज आंभोरकर, कार्यकारी अभियंता संजय पोहेकर आदी यावेळी उपस्थित होते. नागपूर सुधार प्रन्यासच्या नियोजित आराखड्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाच्या कामांच्या सद्य:स्थितीची पाहणी श्री. राऊत यांनी केली. लहान वयापासूनच मुलांना विविध क्रीडा प्रकारांची माहिती व्हावी यासाठी संकुलामध्ये लहान मुलांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात यावा. शिवाय त्यांच्यासाठी लहान जलतरण तलावाची निर्मिती करण्यात यावी. तसेच संकुलातील 200 मीटर धावनपथाचे नुतनीकरण करुन येथे सिंथेटिक ट्रॅक तयार करा. बॉक्सिंग हॉल, व्हॉलीबॉल कोर्ट तसेच टेबल टेनिस क्रीडाप्रकारासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन संकुलासाठी सुसज्ज कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. उत्तर नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल 11 हजार 602 चौरस मीटर क्षेत्रावर वसले आहे. महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत संकुलाच्या विकास कामासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याबाबत सुधारित मागणी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. सद्य:स्थितीत येथे बॅडमिंटन, स्केटिंग, रायफल शूटिंग, टेबल टेनिस, कराटे, तलवारबाजी तसेच योगवर्गाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. येथील प्रत्येक कक्षाची श्री. राऊत यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रायफल शूटिंगचे प्रात्यक्षिकही केले. या संकुलातून प्रशिक्षित झालेली रायफल शूटिंगची राष्ट्रीय खेळाडू अनन्या शारदा नायडू तसेच प्रशिक्षक शशांक चव्हाण यावेळी उपस्थित होते. संकुलाच्या परिसरात श्री. राऊत यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. *******

No comments:

Post a Comment