Sunday 15 August 2021

कोरोनावर मात करण्यासाठी 100 टक्के लसीकरण करुया- पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात · विदर्भात 25 कोटीच्या 200 लसीकरण वाहनाचे लवकरच लोकार्पण · जिल्ह्यात 23 पीएसए ऑक्सिजन प्लॉन्ट उभारणार · नारा डेपोजवळ 54 एकरात बायोडायव्हर्सिटी पार्क उभारणार · स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला 75 चौकांचे मनपातर्फे सौंदर्यीकरण नागपूर, दि. 15 : कोरोनाच्या तिसऱ्या किंवा येणाऱ्या पुढच्या संकटाचा सामना करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने यापूर्वीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणे समन्वयाने काम करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 वा वर्धापनदिनाचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नक्षल विरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, विशेष पोलिस उपमहानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनरेगा आयुक्त अंकित गोयल, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त डॉ. माधवी खोडे, या विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सह पोलिस आयुक्त सुनील फुलारी, अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, निवासी उपजिल्हाधिकारी जगदिश कातकर, तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त आणि उपजिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दोन लाटांचा सर्वांनी सामना केला. दुर्देवाने काही जणांनी आप्तस्वकीय गमावले. त्यांच्याप्रती सहवेदना व्यक्त करुन पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले की, कोरोनाला सामोरे जाताना डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलिस दलातील अधिकारी –कर्मचारी, सफाई कामगार, रुग्णवाहिका चालक, आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका, उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, बँक कर्मचारी यांच्यासह माध्यम प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल आभार मानत जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार नियोजनबद्ध आणि उत्तम काम करत असून, कोरोना चाचणी, खाटांची संख्या वाढ, रुग्ण तपासणी, संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यावर भर देण्यात आला. प्रसंगी खासगी रुग्णालये ताब्यात घेत साडेबाराशे खाटा पहिल्या लाटेत वाढविण्यात आल्याचे सांगून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 900 खाटा, अतिदक्षता खाटा, व्हेंटिलेटर्संची संख्या वाढविण्यासह जिल्ह्यात 12 हजार 49 खाटा निर्माण करण्यात आल्याचे डॉ. राऊत म्हणाले. दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये दरदिवशी 194 मेट्रीक टन वैद्यकीय प्राणवायुची आवश्यकता होती. ती कमी पडल्यामुळे सर्वांच्या सहकार्याने या समस्येवर मात करता आल्याचे सांगून पालकमंत्री निधीतून ‘मिशन ऑक्सिजन’ राबविण्यात आले. त्यासाठी जवळपास 342 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्याचे सांगताना दहा हजारावर नागरिकांना प्राण गमवावे लागल्याची खंतही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली. दोन्ही लाटांचा यशस्वी सामना केल्यानंतर तिसऱ्या लाटेमध्ये दुप्पटीने काम करावे लागणार आहे. त्या तुलनेत दीड पट रुग्णवाढ होण्याची शक्यता असून जिल्ह्यात 23 ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम सुरु आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी 25 कोटी निधीतून प्रत्येकी 11 आसनी क्षमतेची 200 लसीकरण वाहने नागपूर आणि अमरावती विभागासाठी महापारेषण कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून खरेदी करण्यात आली आहेत. लवकरच त्या वाहनांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या वाहनांमधून नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगत डॉ. राऊत म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांची ने-आण, गर्भवती स्त्रियांचे लसीकरण, आकस्मिक आणि आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय चमूला रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी ही वाहने उपयोगात येणार आहेत. कोरोनाचा सामना करताना तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे तसेच विद्यमान महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची मदत झाल्याचा पालकमंत्र्यांनी आवर्जून उल्लेख केला. लॉकडाऊन काळात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, या काळात रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 15 जणांवर गुन्हे दाखल केल्याचे डॉ. राऊत म्हणाले. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात असून, नागपूरकर जनतेने कोविड प्रतिबंधात्मक सामाजिक अंतर पाळणे, वारंवार हात धुणे आणि नाक व तोंडाला मास्क लावणे या त्रिसूत्रीचे पालन करत जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. राऊत यांनी केले. उत्कृष्ट नियोजन करत गावाच्या वेशीवर कोरोना थांबविल्याबद्दल खुर्सापार गावचे सरपंच आणि नागरिकांचे अभिनंदन त्यांनी केले. या काळात सार्वजनिक अन्नधान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून संचारबंदीत निराधार, अनाथ, दिव्यांग आणि रस्त्यावरील नागरिकांना 57 शिवभोजन थाळी केंद्रातून मोफत अन्न पुरवण्यात आले. नागपूर शहरात 10 लाख 66 हजार शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून दोन वर्षात 956 रुग्णांना चार कोटी रुपयांची मदत करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. नागपूर परिसर हा ‘टायगर कॅपिटल’अशी ओळख निर्माण करत असून पर्यटनवृद्धी होत आहे. कोराडी महामार्गावर नारा डेपो येथे इंदिरा गांधी बायोडायव्हर्सिटी पार्क निर्मितीला प्राधान्य देण्यात येत असून, त्यांनी स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. नागपुरात महामेट्रो सुरु झाली, तसेच मिहानला गती देण्यात येत असून, रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभाग, जिल्हा उद्योग कार्यालय, पतपुरवठा संस्था, महामंडळे, अनुसूचित जाती, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समुदायाचाही त्यांनी उल्लेख केला. नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा आणि जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर. या महिला अधिकारी नेतृत्व करत असून, राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकांचा विकास करण्यावर भर देत असल्याचे डॉ. राऊत म्हणाले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतून मदत करताना, सोबतच 130 कोटी रुपये खर्च करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच लोकार्पण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 490 कोटींचे खरीप पीककर्ज वाटप, महाआवास योजनेंतर्गत घरकुल वाटपाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्यावर भर देण्यात आला असून, ऊर्जा मंत्री म्हणून ‘महाकृषी ऊर्जा’ अभियानांतर्गंत जिल्ह्यात 7 हजार 300 शेतकऱ्‍यांनी 23 कोटींची थकबाकी भरली आहे. तसेच जवळपास दोन हजार शेतकऱ्यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. नागपूर शहराला वीजतारामुक्त करण्यात येणार असून, भूमिगत वीजवाहिन्यांवर भर देताना ग्रामीण भागासाठी ‘ग्रामउजाला योजना’ राबविण्यात येणार आहे. तसेच आज शेतकऱ्यांसाठी ई पीकपाहणी मोबाईल ॲप्लिकेशनचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वीर पत्नी प्रमिला नरेश बडोले, वीरपत्नी श्रीमती वंदना बाबुराव डोंगरे, वीरपत्नी श्रीमती कल्पना सुनिल नखाते यांचा गौरव करण्यात आला. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला प्रशस्तीपत्र देऊन सम्मानित करण्यात आले. तसेच कोरोनाच्या दुस-या लाटेत प्रशासकीय स्तरावर कोरोना निवारणार्थ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र. पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे अतिरिक्त संचालक डॉ. कृष्णा शिरमणवार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधीक्षक निलेश काळे यांचा सन्‍मान करण्यात आला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नागपूर यांच्याकडून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत गुंफाबाई दिगंबर मानकर, लिलाबाई अर्जुन डोंगरे, नंदाबाई बबन पाटील, रंजना सिद्धार्थ पाटील, विजय गजानन बावने, हरिचंद महादेव वानखेडे आणि कुणाल मधुकर लोखंडे यांना शेतजमीन पट्टे वाटप करण्यात आले. सन 2020-21 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंर्तगत फळबाग लागवड कार्यात उल्लेखनीय कार्य करणा-या कृषी सहायक शशिकांत इंगोले, कृष्णा घोटे तसेच राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक अंतर्गत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक प्राप्त सहायक समादेशक ललित रामकृपाल यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांना तसेच ऑक्सिजन पुरवठा करताना उल्लेखनीय कामगिरी करत प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल मे. आदित्य एअर प्रॉडक्ट्स, मे. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स यांना प्रशस्तीपत्र देत सन्मान करण्यात आला. महाआवास अभियान पुरस्कार 2020-21 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सर्वोत्कृष्ट पंचायत समिती रामटेक, गट विकास अधिकारी, रामटेक सर्वोत्कृष्ट पंचायत क्लस्टर, सावनेर - बडेगाव येथील संजय भाऊराव सावरकर, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींमध्ये भिवापूर तालुक्यातील महालगाव, महा आवास अभियान पुरस्कार 2020-21 च्या राज्य पुरस्कृत योजना – ग्रामीण, सावनेर गट विकास अधिकारी, सावनेर - सर्वोत्कृष्ट पंचायत क्लस्टर, कुही मांढळ येथील निशांत निलकंठ येवले ग्रा.गृ.अभि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, कुही- तितुर येथील सरपंच व ग्रामसेवकाचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुरस्कार देत गौरव केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश बागदेव यांनी केले. ******

No comments:

Post a Comment