Friday 13 August 2021

आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रीत करा - डॉ. माधवी खोडे

योजनांच्या समन्वय कार्यशाळेचे उद्घाटन नागपूर, दि. 13: अतिदुर्गम आदिवासी भागात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवितांना या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देतांना शैक्षणिक दृष्ट्या आदिवासी मुले मुख्य प्रवाहापासून मागे राहणार नाहीत याची खबरदारी घ्या, असे प्रतिपादन वनामतीच्या संचालक डॉ. माधवी खोडे यांनी केले. आज आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठीच्या समन्वय योजना या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे होते. “विकास आदिवासीचा : समन्वय योजनांचा” एक दिवसीय विभागीय कार्यशाळा वसंतराव कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती ) येथे आयोजित करण्यात आली होती, प्रारंभी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. उपायुक्त दशरथ कुळमेथे, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, रोहण घुगे, अनमोल सागर, श्री. अंकित, शुभम गुप्ता, नितीन इसोकर, दीपक हेडाऊ, निरज मोरे, श्री. बावणकर, सहाय्यक आयुक्त नयन कांबळे, महेश जोशी, विलास कावळे, संशोधन अधिकारी संजय पाठक यावेळी उपस्थित होते. आदिवासींच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना डॉ. माधवी खोडे म्हणाल्या की, सहा वर्षाचे विद्यार्थी आश्रमशाळेत दाखल करतात अशावेळी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असते. आरोग्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आदिवासी मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी वाढीव निधीचा प्रस्ताव तयार करा. आदिवासी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावे. मुलांना चांगले वातावरण मिळण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या शैक्षणिक, कृषी,पशुसंवर्धनासोबतच इतर बाबींवर लक्ष देण्यासाठी जिल्हा विकास निधीमधून योजना राबवा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. चांगल्या गोष्टीचा अंगिकार करुन विकासात्मक दृष्टीकोन ठेवून योजना राबवा. शैक्षणिक बाबींवरील खरेदीवर शाळानिहाय आढावा घ्या. मुलांच्या शिक्षणावर जास्तीत जास्त निधी खर्च करा. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी मागील यशकथांचे शोधन करा व त्यातून प्रेरणा घेण्याच्या सूचना अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी यावेळी केल्या. कार्यशाळेत सादरीकरणाद्वारे विकासात्मक योजनांची माहिती देण्यात आली. आदिवासींच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी व उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर व यशस्वी ठरु शकतील अशा नवीन योजना कार्यान्वित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय विकास, वनहक्क कायद्याची मान्यता, बालहक्क,गौण वनोपज प्रक्रिया, आदिवासींचा आर्थिक विकास व त्याबाबतच्या योजना, उमेद व जिवनोन्नती अभियानाबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा व बख्तबुलंद शहा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करुन कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नयन कांबळे यांनी केले. या कार्यशाळेस विभागातील प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 00000

No comments:

Post a Comment