Saturday 19 February 2022

आजपासून जिल्ह्यात कोविड निर्बंध शिथिल

· सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना 200 ची मर्यादा · लग्न समारंभ, सोहळे 25 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्तींची मर्यादा · कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण बंधनकारक नागपूर, दि. 19 : राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन अधिनियमानुसार नागपूर जिल्ह्यात पहिल्या डोसचे 99 टक्के तर दुसऱ्या डोसचे 71 टक्क्यांवर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे. तसेच कोविड पॉझिटीव्हीटी दरही तीनपेक्षा कमी झाला असल्यामुळे कोविड साथरोगाची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे कोविड निर्बंध शिथिल करण्यासाठी जिल्हा पात्र ठरला असल्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती आर. विमला यांनी आजपासून नागपूर महानगरपालिका क्षेत्र वगळून कोविड निर्बंध शिथिल केले असल्याचे आदेश जाहीर केले आहेत. राष्ट्रीय उद्यान, सरकारी, बाग-बगीचे, प्रेक्षणीय, पर्यटनस्थळे, अम्युझमेंट पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, जल उद्याने, किल्ले व इतर मनोरंजन स्थळे, ब्युटी पार्लर, सलून, हेअर कटींग सलून, वेलनेस सेंटर, जीम, रेस्टारंट, हॉटेल, उपहारगृहे, सिनेमागृह, नाट्यगृह ही नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी कार्यक्रम, लग्न समारंभ, सोहळे नियमित वेळेनुसार 25 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल त्यानुसार सुरु राहतील. अंत्यसंस्कारासाठीची मर्यादा काढून घेतली आहे. नियमितपणे करता येईल. क्रीडा क्रियाकलाप - प्रेक्षकांशिवाय, नियमित वेळेनुसार 50 टक्के क्षमतेने किंवा 200 व्यक्ती यामध्ये जी संख्या लहान असेल, शाळा व कॉलेज - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे 20 जोनवारीचे व उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांचे 25 जानेवारी 2022 च्या शासन परिपत्रकानुसार तसेच आठवडी बाजार नियमित सुरु राहतील. या सर्व ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या भेटी देणाऱ्या सर्व अभ्यागतांचे, येणाऱ्या नागरिक, व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे तसेच खेळाडू व व्यवस्थापकांचे पूर्णपणे लसीकरण करणे अनिवार्य असेल. कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संबधीत नियंत्रित अधिकाऱ्यांनी, व्यवस्थापकांनी कोविड संसर्ग, प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने व कोविड योग्य वर्तनाची अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे श्रीमती आर. विमला यांनी आदेशात म्हटले आहे. हे आदेश नागपूर जिल्ह्यासाठी (महानगर पालिका क्षेत्र वगळून) पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. *****

No comments:

Post a Comment