Monday 14 February 2022

जागतिक पर्यटक विदर्भाकडे वळेल असे नियोजन करा - आदित्य ठाकरे

 नागपूर जिल्ह्याच्या पर्यटन आढावा बैठकीत विविध प्रस्तावांवर चर्चा नागपूर, दि.14 : नागपूर आणि विदर्भामध्ये विपूल वनसंपदा, वाघासारख्या वन्यजीवांची वाढती संख्या, विस्तीर्ण खाणी, मोठे जलसाठे, ऐतिहासिक धार्मिक स्थळे, रस्ते आणि सर्व प्रकारच्या वाहतुकीचे जाळे उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे केली. नागपूर जिल्ह्याच्या पर्यटन आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, अभिजित वंजारी, राजू पारवे, नरेंद्र बोंडे, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी आर.विमला, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक पुरातत्वविद् विजयकुमार नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, नियोजन विभागाचे उपायुक्त धनंजय सुटे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई, राज्य पूरातत्व विभागाच्या जया वाहने यासह पर्यटन, पर्यावरण विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी चंद्रपूर येथे भेट दिली. त्यानंतर आज नागपूर येथे सकाळी नांदगाव येथील फ्लॅयॲश पाँडची पाहणी केली. त्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पर्यटन विकासाबाबत चर्चा केली. विदर्भाकडे प्रेक्षणीय, ऐतिहासिक, अध्यात्मिक असे अनेक पर्यटनस्थळ आहेत. यामध्ये उत्तम समन्वय आवश्यक आहे. कोणताही प्रकल्प बघण्यासाठी जागतिक पर्यटक एका दिवसांसाठी येणार नाही. तो काही दिवस येथे थांबला पाहिजे. त्यामुळे देशाचे नव्हे जगाचे टायगर कॅपिटल, विस्तीर्ण खाणी, विपुल जनसंपदा यासोबत आणखी काही भव्यदिव्य बघण्याची अपेक्षा पर्यटकांना असते. त्यामुळे पर्यटनातील सर्व घटकांचा सेतू बांधून उत्तम प्रस्ताव तयार करण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी नागपुरात जंगल सफारीसोबतच ‘हेरीटेज वॉक’ आयोजित करण्याबाबतही सांगितले. या बैठकीत ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पर्यटन विकासाबाबत जिल्ह्याला वाढीव निधी उपलब्ध करण्यात यावा. मध्यप्रदेशच्या धर्तीवर युको टुरीजमचा विकास करण्यात यावा. विदर्भातील पर्यटनाचे मुंबई व राष्ट्रीय स्तरावर ब्रॅडींग आणि मार्केटींग करण्यात यावे. गोरेवाडा प्रकल्पातील उर्वरीत कामे तातडीने पूर्ण व्हावीत. रामटेक परिसरातील अंभोरा येथे धार्मिक पर्यटनाचा प्रस्तावाला तातडीने मान्यता द्यावी. अंभोरा ते पेंच प्रकल्प क्रूझ व हाऊसबोट प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी केली. खासदार कृपाल तुमाने यांनी खाण पर्यटनाला विदर्भात वाव असून त्यासाठी नव्याने विभागाने तयारी करण्याची मागणी केली. आमदार आशिष जयस्वाल यांनी पर्यटनाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यासोबतच सर्व ठिकाणी प्लॅस्टीक बंदीबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व प्रस्तावांवर सकारात्मक विचार करण्याचे तयांनी स्पष्ट केले. विदर्भात पर्यटन विकासाची क्षमता आहे. त्यामुळे निश्चितच पर्यटनाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले. 00000

No comments:

Post a Comment