Monday 14 February 2022

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात छात्रसेनेची कामगिरी अभिमानास्पद - क्रीडामंत्री सुनील केदार

नागपूर, दि. 14 : राष्ट्रीय छात्रसेनेच्या 20 व्या महाराष्ट्र बटालियनने प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील पथसंचलनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळविला ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची, सन्मानाची आणि स्वाभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गगार क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले. या पथसंचलनात सहभागी झालेल्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या 20 व्या महाराष्ट्र बटालियनचे सात कॅडेट सहभागी झाले होते. क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित‌ कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रूप कमांडर कँप्टन एम. कलीम, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, छात्रसेना कमांडट्सचे प्रशिक्षक कश्मीर सिंह आदी यावेळी उपस्थित होते. दरवर्षी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होऊनही हा सन्मान राज्याला हुलकावणी देत होता. यावर्षी मात्र पथसंचालनात प्रथम क्रमांक मिळवून एनसीसीने राज्याचे नाव उंचावले. नागपुरातील सात कॅडेट्सकडून प्रेरणा घेत अनेक छात्रसेना कॅडेट्सनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी एनसीसीला आवश्यकता असल्यास सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन श्री. केदार यांनी दिले. क्रीडा क्षेत्रात विविध संस्थांची कामे सुरु आहेत. या क्षेत्रात नागपूरचा अमिट ठसा उमटविण्यासाठी विविध प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येत असून, येथे घोडेस्वारी प्रशिक्षण संस्थेचे काम सुरु आहे. तसेच भविष्यात एअर मॉडलिंग शो आयोजित करणार असल्याचे क्रीडामंत्र्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रीय छात्रसेना कॅडेटमध्ये सहभागी होण्याची वेगळी मजा असते. येथे जीवनाला शिस्त लागते आणि आयुष्यभरासाठी स्वयंशिस्तीचे धडेही शिकण्यासाठी ही फिल्ड महत्त्वपूर्ण भूमिका निभावते, असे सांगत महाराष्ट्र छात्रसेनेतील कँडेट्सची संख्या यापुढेही वाढेल, असा विश्वास श्री. केदार यांनी व्यक्त केला. सुभेदार जसपाल सिंह, नायब सुभेदार भारत सिंह, बटालियन हवालदार किरण केएस, हवालदार एम.व्ही. प्यारेलाल, कुलबीर सिंह, अवतार सिंह, अमित मेमाने, मेंगडे निवृत्ती यांच्यासह अशोक कुमार, सत्पालसिंह यादव, संदीप कुमार भाईटा, प्रवीण सोरते, सिनिअर अंडर ऑफिसर प्रिया मिश्रा, ओम झाडे, तृषाली कुथे, मनीष वावरे, मयंक चिंचुलकर, हर्ष पुरी, ज्युनिअर अंडर ऑफिसर श्रुती ओझा यांचा मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रूप कमांडर कॅप्टन एम. कलीम यांनी केले. तर सूत्रसंचालन तस्वीन दुजावाला हीने केले. ****

No comments:

Post a Comment