Monday 14 February 2022

विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात - आदित्य ठाकरे

v ‘माझी वसुंधरा' ही मोहीम अभियान व अभियानातून सवय व्हावी v ‘माझी वसुंधरा' मोहीमेचा विभागीय आढावा नागपूर, दि. 14 : पर्यावरण संवर्धन करतांना विकासाला खोळंबा होतो हा गैरसमज आहे. अनेक प्रकल्प उत्तम समन्वयातून यशस्वीरित्या साकारले आहे. त्यामुळे योग्य नियोजनातून व राजकीय तसेच अन्य व्यासपीठांवर पर्यावरण विषयक चर्चा घडवून आणल्यास मार्ग निघू शकतो. विकास आणि पर्यावरण हातात हात घालूनही पुढे जाऊ शकतात, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणातील बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. विभागीय आयुक्त कार्यालयात ‘माझी वसुधंरा’ या मोहिमेचा विभागीय आढावा आज त्यांनी घेतला. या आढावा बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, ‘माझी वसुधंरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे, विभागातील सहाही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर व चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त, नगर प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. पर्यावरणातील बदल बघता, पडसाद आपल्या दारात उमटायला लागले आहे. त्यामुळे पर्यावरण विषयक तात्काळ प्रतिसाद देण्याची हीच वेळ आहे. पुढच्या पिढीसाठी नाही तर आता आपल्या स्वत:साठी काम करण्याची गरज आहे. डोळसपणे काम केल्यास विकासाच्या आड पर्यावरण येत नाही. सुरुवातीला अडथळा म्हणून बघणाऱ्या विभागाचे माझी वसुधंरा अभियानामुळे महत्व बदलले आहेत. त्यामुळे आता माझी वसुधंरा मोहिमेचे अभियान झाले आहे. लोकसहभागातील या अभियानाला प्रत्येक नागरिकांची सवय बनविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी उत्तमपणे काम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पर्यावरण संरक्षणासाठी जागृती, निर्धारण आणि प्रतिसाद या त्रिसृत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. समस्येच्या मूळापर्यंत जाऊन निराकरण करणे आवश्यक आहे. पर्यावरण विषयाची चर्चा आता घरा-घरात झाली पाहिजे. संकट दारावर आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या राजकीय व्यासपीठावरही चर्चा झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. नागपूर विभागाने या अभियानात अतिशय उत्तम काम केले आहे. त्यामुळे विभागाच्या टीमकडून आणखी अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर यांनी आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीमुळे या विभागाची ओळख बदलली आहे. ‘माझी वसुधंरा’ या अभियानातील सहभागाने हे अभियान लोकचळवळ झाले आहे. प्रत्येक अधिकाऱ्याने हे अभियान आपल्या महत्वपूर्ण योजनेत समाविष्ट केल्यास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये लक्षणीय कामे होऊ शकतात. त्यामुळेच उंच उडी मारण्याची स्पर्धा आम्ही अभियानात ठेवली आहे. काही कामे अधिकाऱ्यांच्या आयुष्यात स्वत:साठी असतात. त्यामुळे स्वत:चे समाधान म्हणून या अभियानाकडे लक्ष वेधा. नागपूर विभाग माझी वसुधंराच्या दुसऱ्या पर्वात पहिल्या तीनमध्ये नक्कीच असले पाहिजे, असे नियोजन करा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. तत्पूर्वी ‘माझी वसुधंरा’ अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांनी अभियानासंदर्भात राज्यस्तरीय माहिती दिली. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी विभागातील अभियानाअंतर्गत झालेल्या कामाचा आढावा सादर केला. तर प्रत्येक जिल्ह्यातील अभिनव प्रयोगाची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांनी केले. 00000

No comments:

Post a Comment