Wednesday 2 March 2022

तांत्रिक निकषाची नव्याने परिभाषा केल्यामुळेच सिंचन प्रकल्पांना गती - मुख्य अभियंता आशिष देवगडे

· शंकरराव चव्हाण स्मृतिदिन सिंचन दिवस · गोसीखुर्द प्रकल्पामुळे सिंचनासह वीज निर्मिती · पक्षी अभयारण्य व पर्यटनाला चालना नागपूर, दि. 2: सिंचन प्रकल्पासाठी तांत्रिक निकषाच्या नव्याने मांडणी केल्यामुळे जायकवाडीसह राज्यातील इतर प्रकल्प माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण होवू शकले. त्यांच्या दूरदृष्टीपणामुळे राज्याच्या सिंचन विकासाला दिशा मिळाली असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची पुण्यतिथी दिवस हा सिंचन दिवस म्हणून साजरा केला जातो. इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स तसेच सिंचन सहयोग नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात श्री. देवगडे बोलत होते. अध्यक्षस्थानी इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष मिलिंद पाठक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सिंचन सहायोगचे अध्यक्ष श्रीकांत डोईफोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शंकरराव चव्हाण यांनी प्रकल्पासाठी तांत्रिक निकषाची नव्याने मांडणी केल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पालाही याचा लाभ झाला आहे. वैनगंगा नदीवरील या प्रकल्पामुळे अडीच लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यासोबतच वीजनिर्मितीसुध्दा पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे पर्यटनासोबतच पक्षी अभयारण्यासारख्या संकल्पना येथे साकारत आहे. प्रकल्प पूर्ण करत असताना पर्यावरणाकडे विशेष लक्ष देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या जलसंपदा विभागात सुरु असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे राज्यातील सिंचन विकासाला चालना मिळाली आहे. जायकवाडी हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या आदर्श नसूनही या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी शंकरराव चव्हाण यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे राज्यात आता या तत्त्वानुसार प्रकल्प होत आहे. त्यांनी केलेल्या प्रकल्पासाठीच्या तांत्रिक निकषाची नव्याने परिभाषा करुन राज्याच्या सिंचन विकासाला चालना मिळाली असल्याचे मुख्य अभियंता श्री. देवगडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष श्री. मिलिंद पाठक सिंचन सहयोगचे अध्यक्ष श्रीकांत डोईफोडे यांनीही मार्गदर्शन केले. तर मिलिंद पाठक यांनी आभार मानले. *****

No comments:

Post a Comment