Wednesday 2 March 2022

स्थानिक कला व संस्कृतीला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबवावे - प्राजक्ता लवंगारे-वर्मा

* दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला भेट * प्रशासन व केंद्राच्या संयुक्त उपक्रमाला प्राधान्य नागपूर, दि. 2: दक्षिण-मध्य क्ष्‍ोत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे देशाच्या सहा राज्यातील कला व संस्कृतीचे संवर्धन व कलावंताच्या प्रोत्साहनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असलेले आयोजन महत्त्वाचे आहे. त्यासोबतच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले. दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी आज सदिच्छा भेट देऊन या केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. तसेच केंद्राच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. जिल्हा प्रशासन तसेच दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रामार्फत विभागातील कला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याला प्राधान्य असल्याचे सांगताना श्रीमती लवंगारे-वर्मा म्हणाल्या की, विभागातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलावंतांना व्यासपीठ मिळावे या दृष्टीने शिल्पग्राम ही संकल्पना राबविण्यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. सध्या खजूराहो (मध्य प्रदेश) येथे केंद्रातर्फे शिल्पग्राम तयार करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर विभागातही अशा प्रकारच्या शिल्पग्रामची आवश्यकता आहे. या केंद्राने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले. केंद्र संचालक डॉ. दीपक खिरवाडकर यांनी केंद्रातर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमावर आधारित पुस्तक तसेच चित्र भेट देऊन विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांचे स्वागत केले. तसेच केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. केंद्रात असलेली सुंदर हस्तशिल्पे, खुला रंगमंच, नव्याने बांधण्यात येणाऱ्या भव्य प्रशासकीय इमारतीची माहिती आणि या केंद्राच्या अंतर्गत येणारे सहा राज्याचे कुटीरचे नविनीकृत करण्याच्या कामांची माहिती दिली. केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या तसेच भविष्यातील उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या. माहिती संचालक हेमराज बागुल, माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, केंद्राच्या उपसंचालक श्रीमती गौरी मराठे-पंडित तसेच कार्यक्रम अधिकारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी केंद्राचे कार्यक्रम प्रभारी शशांक दंडे यांनी एक सुंदर गीत सादर करुन स्वागत केले. *******

No comments:

Post a Comment