Wednesday 16 March 2022

जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रबोधनाची गरज - आर. विमला

• जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन • 22 मार्चपर्यंत विविध उपक्रम नागपूर, दि. 16 : जलस्त्रोतांचे प्रदूषण हा सध्याचा महत्वाचा प्रश्न असून पर्यावरण संवर्धनासह जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी जनजागृती आवश्यक आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्याचा संकल्प यशस्वी करण्यासाठी प्रबोधन करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले. जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व भारतीय जलसंसाधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन आर. विमला यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सिंचन भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार मोहिते होते. माहिती व जनसंपर्क संचालक हेमराज बागुल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. प्रकाश पवार, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, भारतीय जलसंसाधन संस्थेच्या केंद्राचे अध्यक्ष संजय वानखेडे, सचिव प्रवीण महाजन, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे प्रशासक व अधीक्षक अभियंता उमेश पवार, गोसीखुर्दचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई आदी यावेळी उपस्थित होते. उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याचे सांगताना श्रीमती विमला म्हणाल्या की, पाणी वापराबाबत जनतेमध्ये गांभीर्य निर्माण करणे हा जलजागृती सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच शेती व उद्योगाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होईल. यादृष्टीने जलसंपदा विभागाने विशेष कृती आराखडा तयार करावा, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये पाण्याची शुद्धता कायम राहील, तसेच होणारा अपव्यय टाळण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. लोकांमध्ये जलस्त्रोत संवर्धनासह तसेच जलप्रदूषणाबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार असल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची निकड जाणवू लागली आहे. त्यामुळे केवळ पाण्याच्या संदर्भात तात्कालिक उपाययोजना न करता जलजागृतीची प्रक्रिया निरंतर सुरु राहणे आवश्यक आहे. प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळून जलसंवर्धन व स्वच्छतेची शपथ घेऊन तिचे कृतीशील पालन करण्याची गरज असल्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक श्री. बागुल यांनी सांगितले. जलजागृती सप्ताह केवळ सात दिवसांचा मर्यादित न राहता वर्षभर लोकांमध्ये पाण्याविषयी जनजागृती केली जावी. यामध्ये लोकसहभाग मिळविण्यासाठी भारतीय जलसंसाधन संस्थेच्या नागपूर केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे या केंद्राचे अध्यक्ष संजय वानखेडे व सचिव प्रवीण महाजन यांनी यावेळी सांगितले. देशात सर्वाधिक जलसाठे राज्याच्या जलसंपदा विभागाने निर्माण केले आहेत. तसेच उपलब्ध प्राचीन, ऐतिहासिक जलसाठे सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व जलसाठ्यांचे संवर्धन करून त्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखणे भविष्यातील मोठे आव्हान असून त्यावर मात करण्यासाठी लोकांमध्ये जलजागृती होणे आवश्यक असल्याचे मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले. जलजागृती सप्ताह लोकांमध्ये पाण्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. जलजागृतीचा हा वसा कायम राहिल्यास जलप्रदूषण थांबणे, जलस्त्रोतांचे संवर्धन शक्य होईल, असे मुख्य अभियंता श्री. देवगडे यावेळी म्हणाले. जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने विदर्भातील 11 प्रमुख्य नद्यांच्या पाण्याचे कलश सिंचन भवन येथे आणण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते जलपूजनाने जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन झाले. तसेच उपस्थितांनी पाण्याचा वापर व संवर्धन करण्याबाबत जल प्रतिज्ञा घेतली. 22 मार्चपर्यंत विविध उपक्रमांतून पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. गोसीखुर्द बुडीत क्षेत्रातील 470 मीटर लांबीच्या पुलाच्या कामाचा गौरव इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट आणि अल्ट्राटेकच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला आहे. याबद्दल गोसीखुर्द प्रकल्पाच्या सर्व अभियंत्यांचे आज झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता उमेश पवार यांनी केले, तर आभार कार्यकारी अभियंता श्रीमती विजयश्री बुऱ्हाडे यांनी मानले. संचालन कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी केले.

No comments:

Post a Comment