Tuesday 12 September 2023

56 हजार प्रकरणांचा तडजोडीने निकाल राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Ø 143 कोटी रुपयांचे दावे निकाली Ø 23 कुटूंबांचे मनोमिलन, 153 अपघात दाव्यांमध्ये तडजोड, 80 कोटीची कर्जवसूली नागपूर दि. 11 : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 56 हजार 831 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य 143 कोटी रुपये आहे. जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालूका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन 9 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एस. बी. अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश जे. पी. झपाटे, जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सचिन पाटील यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय लोकअदालतीत 23 घटस्फोट व कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यामध्ये आपसी समझोत्याने मनोमिलन होउन पुन्हा नव्याने सुखाचा संसार सुरू झाला याशिवाय 153 मोटार अपघात दाव्यांमध्ये तडजोड झाल्याने रुपये 9 कोटी 8 लाख नुकसान भरपाई प्राप्त झाली तसेच बॅंक व वित्तीय संस्थाकडील 125 प्रकरणामध्ये तडजोड होउन रुपये 80 कोटी 57 लाखाची कर्ज वसूली झाली. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी दावे, भुसंपादन प्रकरणे, तडजोडीयोग्य फौजदारी प्रकरणे, वैवाहिक वाद, मोटार अपघात दावे, विद्युत अधिनियमाची प्रकरणे, पराक्रम्य लेख अधिनियम कलम 138 ची प्रकरणे, कामगार वाद, रक्कम वसुली प्रकरणे आणि इतर दाखलपूर्व प्रकरणे समोपचाराने निपटारा करण्यासाठी ठेवण्यात आली होती. यात पक्षकारांची 29 हजार 913 प्रलंबित प्रकरणे व एक लाख 12 हजार 649 दाखलपुर्व अशी एकूण एक लाख 42 हजार 562 प्रकरणे आपसी तडजोडीसाठी हाताळण्याकरीता एकूण 48 पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलमध्ये न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, वकील व समाजसेवक यांचा समावेश होता. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.आर.पडवळ, जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. व्ही देशपांडे, दिवाणी न्यायाधीश डी. बी. म्हालटकर अॅड. सुष्मा नालस्कर, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष रोशन बागडे तसेच जिल्हातील सर्व न्यायिक अधिकारी, अन्य पदाधिकारी व विधीज्ञ, पॅनल सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक तसेच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी वर्ग, जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आदी राष्ट्रीय लोकअदालतच्या आयोजनात सहभागी झाले होते. 000 --

No comments:

Post a Comment