Thursday 21 September 2023

‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमात जास्तीत जास्त जनसहभाग वाढवा -विभागीय आयुक्त सेवा महिन्यांतर्गत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा

नागपूर, दि.18: भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांमध्ये येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ‘अमृत कलश’ तयार करण्यासाठी जास्तीत जास्त जनसहभाग वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आज दिल्या. विभागात सेवा महिन्यांतर्गत विविध सेवांसदर्भात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करुन जनतेपर्यंत शासनाच्या सेवा पुरविण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. श्रीमती बिदरी यांनी आज नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा बैठक घेतली. उपायुक्त (विकास) डॉ.कमलकिशोर फुटाणे, उपायुक्त (प्रशासन) प्रदीप कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत १ ते ३० सप्टेंबर दरम्यान देशातील गावांमधून माती गोळा करुन अमृत कलश तयार करण्यात येत आहेत. नागपूर विभागातील गावांमध्ये या उपक्रमांतर्गत आतापर्यंत तयार झालेल्या अमृत कलशाची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण ग्रामीण घरांची संख्या, त्यांच्याकडून कलशामध्ये गोळा करण्यात आलेली माती किंवा तांदुळ, जिल्ह्यांतील ग्रामपंचायती आदींची माहिती यावेळी देण्यात आली. आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठविण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. उर्वरित गावांमध्ये लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘अमृत कलश’ तयार करण्याच्या उपक्रमात जनसहभाग वाढविण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात तालुका स्तरावर १ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ग्रामपंचायतींकडून गट विकास अधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात ‘अमृत कलश’ जमा करुन घेण्यासंदर्भात तसेच तालुक्यातून ‘अमृत कलश’ मुंबई मार्गे दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमात नेण्यासाठी एका तालुक्यातून दोन युवकांची निवड करण्याचे श्रीमती बिदरी यांनी सांगितले. २२ ते २७ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील सर्व तालुक्यातील कलश घेवून युवक मुंबई येथे गोळा होतील. यानंतर २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे युवक रवाना होतील. १ नाव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात अमृत वाटिकेमध्ये वापरण्यात येणार आहेत. राज्यात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत असलेल्या सेवा महिन्यांतर्गत नागपूर विभागात विविध सेवांसदर्भात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या. तसेच या कार्यक्रमांतर्गत नव्याने २५ सेवा देण्याचे ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मागील वर्षी सेवा पंधरवाड्यांतर्गत १३ लाख म्हणजेच ९९ टक्के प्रलबिंत प्रकरणांचा निपटारा करण्यात आला होता. 0000000000

No comments:

Post a Comment