Thursday 21 September 2023

‘शिकेल त्याला रोजगार’ अशा शिक्षण व्यवस्थेची तयारी - उपमुख्यमंत्री

*कौशल्यप्राप्त मनुष्यबळ देशाच्या अर्थव्यवस्थेचे चालक बनतील *आयटीआय पदवीदान समारंभ नागपूर दि. 17 :- उद्योग क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार औद्योगिकरण व शिक्षण यांची सांगड घालून अभ्यासक्रमात केलेल्या बदलामुळे प्रशिक्षीत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाद्वारे मोठ्या प्रमाणात उद्योगांशी सामंज्यस्य करार करून त्यांच्याकरिता कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जो शिकेल, त्याला रोजगार मिळेलच अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ आज येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला. कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रविण दटके, आमदार मोहन मते, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. छोट्या-मोठ्या 32 प्रकारच्या उद्योगांना कौशल्य प्रशिक्षीत मनुष्यबळाची गरज नियमीत लागत असते. ही बाब लक्षात घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षणाची सुरूवात केली. त्यामुळे आयटीआयचे आधुनिकीकरण होवून येथील अभ्यासक्रमात रोजगाराभिमुख बदल करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून 2014 मध्येथ अकराव्या स्थानी असलेली आपली अर्थव्यवस्था आज जगात पहिल्या पाच मध्ये आली असल्याचे श्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. जागतिक अर्थव्यवस्थेतील आपली भरारी, जी20चे आयोजन व चंद्रायानाचे यशस्वी प्रक्षेपण या यशामुळे जगाचे लक्ष भारताकडे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला अजून पुढे नेण्यासाठी कौशल्य विकसित मनुष्यबळाचे महत्त्वाचे योगदान राहणार आहे. आज कौशल्य प्राप्त करणारे विद्यार्थी पुढे देशाच्या अर्थव्यवस्थेचे चालक बनतील, असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. यावेळी नागपूर व अमरावती विभागातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आयटीआय संस्थांना गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी आयटीआय च्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासवर आधारीत ‘कौशल्य ज्योती’ या मराठीतील पहिल्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच आयटीआय संस्थेची स्वच्छता व सुशोभिकरण पंधरवाडाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment