Thursday 21 September 2023

'इंडस्ट्री मिट’च्या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

426 सामंजस्य करार, विदर्भातील 28 कंपन्यांचा सहभाग कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती नागपूर दि. 17 :- देशाच्या अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण होत असून अनेक संधी उपलब्ध होत आहेत. कुशल मनुष्यबळाची गरज उद्योग जगताला आहे. कुशल मनुष्यबळाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबरच उद्योगाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. ‘इंडस्ट्री मिट’ सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योगांना आवश्यक असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासन, उद्योगसमूह आणि प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात आज ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून ४२६ सामंजस्य करार करण्यात आले. यात विदर्भातील २८ कंपन्यांचा सहभाग आहे. कराराच्या माध्यमातून सुमारे १ लाख २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे ‘इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, आयुक्त डॅा. रामास्वामी एन., जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, उपायुक्त (नागपूर विभाग) प्रकाश देशमाने, उपायुक्त (अमरावती विभाग) दत्तात्रय ठाकरे, सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या विश्वकर्मा जयंतीच्या औचित्याचा उल्लेख करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की, आज इंडस्ट्री मिटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचा आनंद आहे. कौशल्य विकासाला पाठबळ देण्याचे शासनाचे धोरण आहे. या धोरणांतर्गत महाराष्ट्रातील पहिले कौशल्य विद्यापीठ पनवेलजवळ सुरू करण्यात आले आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे आधुनिकीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रोजगार मेळावे प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत आहेत. विविध उद्योगांशी संपर्क साधून ‘इंडस्ट्री मिट’च्या माध्यमातून करार करून आवश्यक मनुष्यबळ पुरविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून अनेक रोजगाराभिमुख उपक्रम विभागामार्फत राबविण्यात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. *****

No comments:

Post a Comment