Wednesday 18 October 2023

विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मोबाईल ॲपच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रम - विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर, दि. 17 : ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्यभूत ठरणारा ‘आकांशा’ या ‘शिक्षण आपल्या दारी’ प्रकल्पांतर्गत विभागातील सर्व शासकीय शाळांमध्ये अँड्रॉईड मोबाईल ॲपच्या माध्यमातून 10 वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषय सुलभपणे मोफत शिकता येणार आहे. हा प्रकल्प 50 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी रोटरी क्लबची मदत होणार असल्याची माहिती, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिली. विभागातील जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपरिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता ९वी व १०वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आकांशा’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी प्रशासनाला रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊन संपूर्ण शैक्षणिक ॲप मोफत उपलब्ध करून देणार आहे. रोटरीचे प्रकल्प प्रमुख विरेंद्र पात्रिकर, अध्यक्ष अभिजित देशपांडे व प्रकल्प सल्लागार मोहन पांडे यांनी विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांना या प्रकल्पासंदर्भात संमतीपत्र आज दिले. ‘आकांशा’ प्रकल्प विभागातील इयत्ता १०वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व इयत्ता ९वी मध्ये प्रवेश घेत असलेल्या मराठी, सेमी इंग्लीश आणि इंग्लीश माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.प्रारंभी जिल्हा परिषद, महानगरपालिका व नगरपरिषदेच्या शांळातील विद्यार्थ्यांची मुख्याध्यापकांमार्फत नोंदणी करून जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा निहाय नोंदणी करण्यात येईल व या नोंदणी नुसार मुख्याध्यापकांमार्फत लॉगईन सुविधा देण्यात येईल. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी विकास उपायुक्त डॉ. कमलकिशोर फुटाणे, नगर प्रशासनाच्या सहायक आयुक्त संघमित्रा ढोके यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्पास राज्यशासनाच्या बालभारती पाठयक्रम मंडळाची मान्यता घेण्यात आली आहे. शिकवणीवर होणार खर्च टाळून विद्यार्थ्यांना सहाय्यभूत शिक्षण मोफत उपलब्ध करून देणे आणि इयत्ता १०वीचे शिक्षण सुलभ व आनंददायी व्हावे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. नगर पालिका,महानगर पालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांतील नोंदणी झाल्यानंतर ईतर खाजगी शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना या अँड्रॉईड मोबाईल ॲपचा लाभ देण्यात येईल. रोटरी क्लबतर्फे इयत्ता १०वीच्या ५० हजार विद्यार्थ्यांपर्यंत अँड्रॉईड मोबाईल ॲप पोहोचविण्याची जबाबदारी राहणार आहे. रोटरीचे जिल्हा प्रकल्प सचिव विरेंद्र पात्रिकर व प्रकल्प सल्लागार मोहन पांडे यांनी या प्रकल्पासंबंधीचे सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. विभागातील सर्व शासकीय शाळांमधून हा प्रकल्प प्राधान्याने राबविण्याची त्यांनी विभागीय आयुक्तांना विनंती केली. ०००००

No comments:

Post a Comment