Ø जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सामीत्व योजनेच्या लाभाचे वाटप
Ø प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील लाभार्थ्याशी
संवाद
नागपूर, दि. 18 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्याला त्याच्या
मालकीच्या जागेचे कायदेशीर स्वामीत्व मिळावे यासाठी स्वामित्व योजना सुरू केली आहे.
ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य बदलविणारी ही योजना आहे. या योजनेमुळे कायदेशीर मालकत्व
प्राप्त होणार आहे. बँकेचे कर्ज घेण्यासह विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
वनामती येथील सभागृहात आज सामीत्व योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात
लाभाचे वाटप आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील लाभार्थ्याशी संवाद साधला.
तत्पूर्वी, आयोजित कार्यक्रमात महसूलमंत्री श्री. बावनकुळे बोलत होते.
कार्यक्रमाला खासदार शामकुमार बर्वे, आमदार कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी
बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी
तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू
शिंदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अभय जोशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. कपिल कलोडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, लाभार्थी व त्यांचे
कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा लाभार्थ्यांना
सामीत्व योजनेच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले.
महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला हा मंत्र दिला होता. हा नारा ख-या अर्थाने
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगीकारला आहे. गेल्या दहा वर्षात गावाकडे चला ही
भूमिका घेऊन गावांचा विकास होत आहे. समाजातील छोट्या छोट्या घटकांसाठी विविध लोककल्याणाच्या
योजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने स्वामीत्व योजना राबविण्यात येत असल्याचे
ते म्हणाले.
राज्यातील सुमारे ८.५ कोटी नागरिक वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आहेत. या योजनांच्या
माध्यमातून महाराष्ट्र स्वयंपूर्ण होत आहे. महाराष्ट्राचे बळकटीकरण हे वैयक्तिक लाभार्थी
योजनांच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्यांपासून ते शेतमजुरांपर्यंत योजना राबविण्यात
येत आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत मिळून सर्वांनी काम करण्याची गरज असून यातून
ग्रामीण महाराष्ट्राचे चित्र बदलवूया, असे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात गतीमान आणि पारदर्शी
काम करण्यावर भर असणार आहे. येत्या शंभर दिवसात महसुली खात्याने दिलेले उद्दिष्ट पूर्ण
करण्याची गरज आहे. या अनुषंगाने सर्व मुद्रांक कार्यालये ही पासपोर्ट कार्यालये करीत
असल्याचे ते म्हणाले. पांदण, शिवपांदण रस्त्यांना आता रस्ते क्रमांक मिळणार आहेत. यातून
वेगवेगळ्या योजनेतून या रस्त्यांची कामे करता येणे शक्य होणार आहे. येत्या काळात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बदललेला महाराष्ट्र दिसेल. प्रशासनाला विविध योजना
व उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी
केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.
स्वामीत्व योजनेचे फायदे
१. सनद ही शासनाने नागरीकांना दिलेला हक्काचा पुरावा आहे.
२. सनदेमध्ये धारकांचे नाव, क्षेत्र, नगर भूमापन क्रमांक, चतुः सीमेनुसार नकाशा
दिलेला असतो.
३. सनद हा मालकी हक्काचा पुरावा असल्याने कोणत्याही शासकीय कामकाजासाठी तो ग्राह्य
धरला जातो.
४. सनदेच्या आधाराने धारकाला कर्ज उपलब्धता होईल.
५. सनद धारकाला शासनाच्या विविध आवास योजनेच्या मंजूरी कामी फायदा मिळेल.
६. सनदेमुळे खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता येऊन नागरीकांची फसवणूक टळेल.
७. सनद ही अहस्तंतरणीय (Non transterable) असलेने धारकास कायमस्वरूपी वंशपरंपरागत
मालकी हक्काचा पुरावा शासनाकडुन मिळेल.
८. सदनेमुळे धारकांची पर्यायाने गावाची पत सुधारेल.
000000



No comments:
Post a Comment