Saturday, 8 March 2025

नागपूर विभागातील कामगारांच्या पाल्यांना 17 कोटींच्यावर शैक्षणिक सहाय्य

 



नागपूर, दि. 8 : नोंदीत कामगारांना राज्य शासनाच्या कामगार विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्य विषयक योजनांचे लाभ थेट लाभ हस्तांतरण (डिबिटी) पद्धतीने देण्यात येतात. यानुसार कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात येते. जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान इयत्ता 7वी पर्यंतच्या शिक्षणासाठी,  इयत्ता 8वी ते  10वी साठी, 11वी व 12वीतील पाल्यांना शैक्षणिक सहाय्य आणि 10वी व 12वी उत्तीर्ण पाल्यांना प्रोत्साहन राशी स्वरूपात 17 कोटी 72 लाख 76 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार नियम, 2007 अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. राज्यभरातील कामगार कार्यालयांमार्फत या मंडळाच्यामाध्यमातून कामगारांची नोंदणी करण्यात येते व विविध कल्याणकारी  योजनांचे लाभ पुरविण्यात येतात. नोंदीत कामगारांना कामगार विभागाने जाहीर केलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्य विषयक योजनांचे लाभ थेट डिबिटी पद्धतीने देण्यात येतात. तसेच कामगारांना अत्यावश्यक संच, सुरक्षा संच व गृहोपयोगी वस्तू संच वितरीत करण्यात येतात.

नागपूर विभागात 23 हजारांवर कामगारांच्या पाल्यांना 8 कोटींपेक्षा जास्त कामगारांना शैक्षणिक सहाय्यांतर्गत त्यांच्या दोन पाल्यांना शाळेतील किमान 75 टक्के किंवा अधिक उपस्थिती असणाऱ्या इयत्ता 1 ली ते 7वी साठी प्रतिवर्षी 2 हजार 500 रुपये तर 8वी ते 10वी साठी प्रतिवर्षी 5 हजार रुपये शैक्षणिक अर्थ सहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गत नागपूर विभागात 23 हजार 632 कामगारांच्या पाल्यांना 8 कोटी 35 लाख 56 हजार रुपयांचे शैक्षणिक सहाय्य देण्यात आले. या योजनेंतर्गत विभागात सर्वाधिक 11 हजार 681 लाभार्थी वर्धा जिल्ह्यातील असून त्यांना 4 कोटी 20 लाख 45 हजार रुपयांचे शैक्षणिक सहाय्य प्रदान करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील 7 हजार 281 लाभार्थ्यांना 2 कोटी 53 लाख 50 हजार रुपयांचे, भंडारा जिल्ह्यातील 337 लाभार्थ्यांना 11 लाख 32 हजार 500 रुपयांचे, गोदिंया जिल्ह्यातील 1 हजार 959 लाभार्थ्यांना 69 लाख 60 हजार रुपयांचे, चंद्रपूर जिल्ह्यातील 196 लाभार्थ्यांना 6 लाख 90 हजार रुपयांचे आणि गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 178 लाभार्थ्यांना 73 लाख 87 हजार 500 रुपयांचे शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात आले.

कामगारांच्या इयत्ता 11वी व 12वीतील पाल्यांच्या शिक्षणासाठी 7 कोटींच्यावर शैक्षणिक सहाय्य तर इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण पाल्यांना 2 कोटीं पेक्षा जास्त प्रोत्साहन सहाय्य प्रदान करण्यात आले.  कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10 हजार रुपयांचे शैक्षणिक सहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गत विभागातील कामगारांच्या 7 हजार 193 पाल्यांना 7 कोटी 19 लाख 30 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरीत करण्यात आले.  यात सर्वाधिक वर्धा जिल्ह्यातील 4 हजार 462 लाभार्थ्यांना 4 कोटी 46 लाख 20 हजार रूपयांचे शैक्षणिक अर्थ सहाय्य देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील 1 हजार 605 लाभार्थ्यांना 1 कोटी 60 लाख 50 हजार रूपयांचे शैक्षणिक सहाय्य देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील 80 लाभार्थ्यांना 8 लाखांचे, गोंदिया जिल्ह्यातील 544 लाभार्थ्यांना 54 लाख 40 हजारांचे, चंद्रपूर जिल्ह्यातील 57 लाभार्थ्यांना 5 लाख 70 हजारांचे आणि गडचिरोली जिल्ह्यातील 445 लाभार्थ्यांना 44 लाख 50 हजारांचे शैक्षणिक सहाय्य देण्यात आले.

कामगारांच्या दोन पाल्यांना इयत्ता 10वी व 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10 हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य देण्यात येते. विभागातील कामगारांच्या 2 हजार 179 पाल्यांना 2 कोटी 17 लाख 90 हजार रुपयांचे प्रोत्साहन शैक्षणिक सहाय्य देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील 398 लाभार्थ्यांना 39 लाख 80 हजार रुपयांचे प्रोत्साहन शैक्षणिक सहाय्य देण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील 13 लाभार्थ्यांना  1 लाख 30 हजारांचे, गोदिंया जिल्ह्यातील 122 लाभार्थ्यांना 12 लाख 20 हजारांचे, चंद्रपूर जिल्ह्यातील 19 लाभार्थ्यांना 1 लाख 90 हजारांचे, वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 424 लाभार्थ्यांना 1 कोटी 42 लाख 40 हजारांचे आणि गडचिरोली जिल्ह्यातील 203 लाभार्थ्यांना 20 लाख 30 हजार रुपयांचे प्रोत्साहन शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यात आले.

 

०००००००

 

 

No comments:

Post a Comment