Saturday, 8 March 2025

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्यविषयक सर्वेक्षणात परिपूर्ण माहिती द्यावी - सहसंचालक ते. श्रा. तिडके

 


                        

नागपूर, दि. 08 : राष्ट्रीय नमुना पाहणी अंतर्गत कुटुंबांच्या सामाजिक आरोग्याविषयी नागपूर विभागात केंद्र शासनाकडून जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य व परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक ते. श्रा. तिडके यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 80 व्या फेरी अंतर्गत कुटुंबांचा ‘सामाजिक उपभोग-आरोग्य’ या विषयावर विस्तृत माहिती संकलीत करण्याच्या निर्देशानूसार हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.  या सर्वेक्षणाच्या निष्कर्षाद्वारे केंद्र व राज्य शासनाला आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा करण्यासंदर्भात नियोजन आखणे व धोरणे राबविण्यासाठी मदत होणार आहे. राज्यातील विविध भागात हे सर्वेक्षण होत आहे. विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण होत असून आरोग्यावर कुटुंबांचा होणारा खर्च, एक वर्षापर्यंतच्या बालकांचे करण्यात येणारे लसीकरण तसेच गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधा यांची माहिती संकलीत करण्यात येणार आहे.

प्रश्नावलीच्या माध्यमातून नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबांकडून मागील वर्षभरात आरोग्य विषयक खर्चाबाबत विस्तृत माहिती संकलीत करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित करण्यात येणार आहेत. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून आतापर्यंत राज्यात 79 सर्वेक्षण यशस्वीपणे करण्यात आले आहे. तर 80 व्या सर्वेक्षणासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025च्या पहिल्या आठवड्यात प्रशिक्षीत करण्यात आले आहे.  घरोघरी येणाऱ्या या सर्वेक्षण अधिकाऱ्यांना योग्य व परिपूर्ण माहिती देवून राष्ट्र कार्यात सहकार्य करण्याचे सहसंचालक ते. श्रा. तिडके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. 

00000

 


No comments:

Post a Comment