नागपूर,दि.5 : वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडून
केंद्र व राज्य शासनाच्या हातमाग विणकर, हस्तकला विकासासाठीच्या योजनांची अंमलबजावणी
करण्यात येत आहे. आयुक्तालयाद्वारे मोफत वीज अनुदान योजनेच्या माध्यमातून 1 हजार
63 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत असून 2 हजार 240 लाभार्थ्यांना उत्सव भत्ता तर
628 हातमाग विणकरांना धाग्यावर अतिरिक्त अनुदान देण्यात आले आहे.
राज्यातील विणकर,
हस्तकला व हातमागाच्या विकासासाठी वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग
धोरण 2023-28 जाहीर केले आहे. त्यानुसार धोरणाच्या अंमलबजावणीसह केंद्र व राज्य शासनाच्या
हातमाग विणकर, हस्तकला विकासासाठीच्या योजनांची अंमलबजावणी नागपूर स्थित वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडून करण्यात येत आहे.
हातमाग विणकर कुटुंबांना प्रती महिना 200 युनिट पर्यंत
मोफत वीज अनुदान देणारी ‘मोफत वीज अनुदान योजना’ आयुक्तालयाच्यावतीने राबविण्यात येते.
सदर योजनेंतर्गत एकूण 1 हजार 63 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. वर्ष 2023-24 मध्ये
660 लाभार्थ्यांच्या वीज अनुदानापोटी महावितरण मुंबईला वस्त्रोद्योग आयुक्तालयातर्फे
1 कोटी 30 लाख रुपये अदा करण्यात आले. तर वर्ष 2024-25 मध्ये 403 नवीन लाभार्थ्यांचे
अर्ज प्राप्त झाले आहेत.
कच्चा माल पुरवठा
योजनेतील (आरएमएसएस) धाग्यावर हातमाग विणकरांना अतिरिक्त अनुदान देण्यात येते. या योजनेमध्ये
केंद्र व राज्याकडून प्रत्येकी 15 टक्के सवलत देण्याची तरतूद आहे. सदर अनुदान हे कॉटन
हँक धागा, घरगुती रेशीम, लोकरी आणि लीनन धागा आणि नैसर्गिक तंतुच्या मिश्रीत धाग्यावरच
देण्यात येते. वर्ष 2023-24 मध्ये 628 लाभार्थ्यांना 55 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान
मंजूर करण्यात आले. तर वर्ष 2024-25 मध्ये 360 लाभार्थ्यांना 1 कोटी 64 लाख 15 हजार
रुपयांच्या अनुदानाची मागणी प्राप्त झाली आहे.
राज्यातील
हातमागाच्या 5 पारंपरिक वाणांमधील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना प्रोत्साहन देण्याकरिता
गणेश चतुर्थी किंवा मकरसंक्रांतीनिमित्त पुरुष विणकरांना 10 हजार रुपये तर महिला विणकरांना
15 हजार रुपये उत्सव भत्ता देण्यात येतो. या योजनेंतर्गत एकूण 2 हजार 240 लाभार्थ्यांना
लाभ देण्यात आला. वर्ष 2023-24 मध्ये 1 हजार
175 पुरुष लाभार्थी व 664 महिला लाभार्थी अशा एकूण 1 हजार 819 लाभार्थ्यांना लाभ देण्यात
आला. वर्ष 2024-25 मध्ये नव्याने 285 पुरुष लाभार्थी व 136 महिला लाभार्थी असे एकूण
421 लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
‘अर्बन हाट केंद्र’
वस्त्रोद्योग
आयुक्तालयाने केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. ‘अर्बन
हाट केंद्र’ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील विणकर
आणि हस्तकलांना बाजारपेठ उपलब्ध करुन देणारी योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले
आहे. राज्यात प्रमुख ठिकाणी अर्बन हाट केंद्र स्थापीत करण्यासाठी प्रकल्प किंमतीच्या
80 टक्के हिस्सा केंद्र शासनाकडे तर उर्वरित 20 टक्के हिस्सा राज्य शासन वहन करणार
आहे.
‘प्रधानमंत्री
जीवन ज्योती विमा
18 ते 50 वर्ष
वयोगटातील हातमाग विणकराचा कोणत्याही कारणाने मृत्यु झाल्यास त्यांना विमा संरक्षण
देण्यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तलयाकडून केंद्र पुरस्कृत ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती
विमा’योजनेंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्यात
येतो. या योजनेचा वार्षिक हप्ता (प्रिमियम) 436 रुपये असून केंद्र शासनाकडून 198 रुपये
व राज्य शासनाकडून 238 रुपयांचा हिस्सा देण्यात येतो.
‘पारंपरिक हातमाग विणकरांना बक्षीस योजना’
राज्यातील पैठणी
साडी, हिमरु शाल, करवत काटी, घोंगडी व खणफॅब्रीक या पाच पारंपरिक क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट
डिझाईनला ‘पारंपरिक हातमाग विणकरांना बक्षीस योजना’अंतर्गत राष्ट्रीय
हातमाग दिनानिमित्त बक्षीस वितरीत करण्यात येते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या
पुरस्कारासाठी अनुक्रमे 20 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे रोख रक्कम बक्षीस स्वरुपात
देण्यात येतात.
000000

No comments:
Post a Comment