नागपूर, दि. 15 : शासनाच्या
अनेक लोककल्याणकारी योजना या शेवटच्या घटकातील व्यक्तीचा विकास व्हावा यादृष्टीने आखण्यात
आल्या आहेत. यात राज्य शासनासह केंद्र शासनाच्याही योजना आहेत. शेतीपासून पशुसंवर्धनापर्यंत,
शिक्षणापासून आरोग्यापर्यंत असणा-या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी
तालुका पातळीवरील प्रत्येक संबंधित विभागप्रमुखांनी सरपंचांशी प्रत्यक्ष समन्वय साधावा,
असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मौदा येथे आयोजित सरपंचांच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता,
संख्याज्ञान, कौशल्य विकसित व्हावे यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. याची अंमलबजावणी
ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक शाळेत झाली पाहिजे. त्यादृष्टीने जोपर्यंत पंचायत
समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक शाळांशी समन्वय ठेवणार नाहीत तोपर्यंत वस्तुस्थिती
लक्षात येणार नाही. दूरदृष्टी ठेवून मंत्रालय पातळीवर आम्ही शासन निर्गमित करतो हे
लक्षात घेऊन त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही त्या त्या विभागप्रमुखांची
आहे हे विसरता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय विभागांतर्गत, पशुसंवर्धन विभागांतर्गत,
कृषी विभागांतर्गत अनेक पायाभूत विकासाच्या योजना आहेत. यात आरोग्याच्या पण आहेत. शेताला
जाणारे पांदण रस्ते शेतक-यांना मिळावेत यासाठी आपण राज्यभर मोहीम हाती घेतली आहे. याची
अंमलबजावणी प्रत्येक गावपातळीवरील कंत्राटदार व अभियंत्याने जबाबदारीने पार पाडली पाहिजे.
यात कुणाच्या तक्रारी येता कामा नये. ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत त्यांच्याविरुद्ध
पोलिस कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
आरोग्य विभागाबाबत अनेक तक्रारी आहेत. संबंधित तालुका
आरोग्य अधिका-याने तालुक्यातील प्राथमिक व उपप्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन
पाहणी केली पाहिजे. प्रत्येक सरपंचाशी समन्वय ठेवून साथीचे आजार, कुष्ठरोग, हत्तीरोग
अशा आजारांच्या उच्चाटनासाठी कटिबद्ध असले पाहिजे. जोपर्यंत अधिकारीवर्ग गावपातळीवर
जाऊन याचा आढावा घेणार नाही तोपर्यंत लोकांना मिळणा-या सुविधेत बदल होणार नाहीत, असे
पालकमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस माजी आमदार टेकचंद सावरकर, उपविभागीय अधिकारी
सचिन गोसावी, गटविकास अधिकारी विजय झिंगळे व पंचायत समितीतील अधिकारी, मौदा तालुक्यातील
सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक अधिकारी प्रत्यक्ष गावात
भेट देऊन ग्रामपंचायतीशी शासकीय योजनांबाबत चर्चा करत नसल्याच्या तक्रारीबाबत पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिका-यांकडून खुलासा मागवून
घेतला.
*****
No comments:
Post a Comment