Friday, 26 September 2025

धम्मचक्र प्रवर्तन दिनाची संपूर्ण तयारी 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करा - विजयलक्ष्मी बिदरी

 


Ø  धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व्यवस्थेचा आढावा

Ø  सुरक्षेसाठी 56 सीसीटीव्ही कॅमेरांची निगरानी

Ø  व्यवस्थेची संपूर्ण माहिती डॅशबोर्डवर

Ø  एक हजार शौचालय, 120 नळाद्वारे पाणीपुरवठा

 

नागपूर, दि. 25 : 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध भागातून लाखो भाविक दिक्षाभूमीला भेट देणार असल्यामूळे जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सुविधा येत्या 30 सप्टेंबर पूर्वी पूर्ण करतांनाच नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रशासनाच्या विविध यंत्रणांकडून करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी घेतला त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. 

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, विश्वस्त विलास गजघाटे, सदस्य सुधीर फुलझेले, डॉ. प्रदिप आगलावे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, महानगपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजुसिंग पवार तसेच पोलीस, महसूल, परिवहन, आरोग्य, अन्न व प्रशासन आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 दीक्षाभूमी येथे 69 व्या धम्मचक्र दिनानिमित्त लाखो भावीक भेट देत असल्यामूळे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करतांना जिल्हा प्रशासनातर्फे येणाऱ्या भावीकांची गैरसोय होणार नाही. तसेच या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह, स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात महानगरपालिकेसह विविध विभागांकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. संपूर्ण देशातून मागिल वर्षीप्रमाणे 10 ते 12 लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहतील यादृष्टीने व्यवस्था करतांना विविध यंत्रणांनी समन्वयाने संपूर्ण जबाबदारी पार पाडावी, अशी सूचना श्रीमती बिदरी यांनी यावेळी केली.

 दिक्षाभूमी परिसरात प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विभागनिहाय सुविधांचा आढावा घेतांना श्रीमती बिदरी म्हणाल्या की, दिनांक 02 ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा असून संपूर्ण भारतातून दिनांक 30 सप्टेंबर पासून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. ही व्यवस्था 3 ऑक्टोंबर पर्यंत करावयाची असल्यामूळे या परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस विभागतार्फे स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करावे. या नियंत्रण कक्षात इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून जलद व सुलभ व्यवस्था कशी सांभाळता येईल यासाठी समन्वय आवश्यक आहे. येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाणी, शौचालय व स्वच्छतेसंदर्भात महानगपालिकेतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. दिक्षाभूमी परिसरात यासाठी 120 नळ उभारण्यात आले असून भोजनदान करणाऱ्या संस्थांसाठी अतिरिक्त 7 टँकर सज्ज ठेवण्यात आले आहे. दिक्षाभूमी परिसरात माता कचेरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आदी परिसरात 992 शौचालय उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच मोबाईल शौचालयाची सुविधा राहणार आहेत. पावसाच्या दृष्टीने परिसरातील शाळांमध्ये राहण्यासाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात येत असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.

 दिक्षाभूमी परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून मोबाईल टॉवर सुद्धा उभारण्यात आला आहे. संभाव्य गर्दीच्या नियंत्रणासाठी व सुरक्षेच्यादृष्टीने स्टॉलवर खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सिलेंडर, इतर ज्वलनशील साहित्य ठेवता येणार नाही, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिली. दिक्षाभूमी येथील स्तूपाकडे प्रवेश तसेच दर्शनानंतर बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  व्यवस्थेसंदर्भातील संपूर्ण माहिती सोशल मिडिया व डॅशबोर्डवर उपलब्ध राहणार आहे. रेल्वे स्टेशन व बसस्टॅण्ड तसेच ड्रॅगन पॅलेसला भेट देण्यासाठी परिवहन विभागातर्फे 110 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूर शहरातील भाविकांसाठी 11 मार्गांवर दिनांक 30 सप्टेंबर पासून आपली बस सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी या व्यवस्थेचा वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

                                                      अन्नदान करण्यापूर्वी तपासणी आवश्यक

         दिक्षाभूमीवरील भाविकांसाठी विविध संस्था व संघटनांकडून अन्नदानाची व्यवस्था करण्यात येते. अन्नदान करतांना गर्दी होणार नाही. तसेच गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे स्वतंत्र पथकामार्फत अन्नदान करण्यापूर्वी तपासणी करूनच वितरण करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

             जिल्हा प्रशासन व महानगपालिकेतर्फे दिक्षाभूमीवर येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेली व्यवस्था तसेच वाहतूक व्यवस्था, ड्रॅगन पॅलेसला भेट देणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आलेली व्यवस्था, परिवहन व्यवस्था आदी माहिती शहराच्या विविध भागात प्रदर्शित करण्यात येणार आहे. आरोग्य विभागातर्फे रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच परिसरातील महत्वाच्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. पोलीस विभागातर्फे दिक्षाभूमी परिसरात एक हजारपेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी सुरक्षेच्यादृष्टीने नियुक्त करण्यात आले आहे. अग्निशमन यंत्रणा, वाहनतळ तसेच हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातील माहिती देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष व महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाद्वारे सुविधा राहणार आहे. यावर्षी मागील वर्षापेक्षा जास्त भाविक उपस्थित राहतील, यादृष्टीने व्यवस्था सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

             दिक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने दिक्षाभूमी परिसरात 350 पेक्षा जास्त पुस्तक विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी केली.  प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे अपर आयुक्त तेजुसिंग पवार यांनी प्रास्ताविक केले.

0000

 

 

No comments:

Post a Comment