नागपूर दि.२०:- गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील राष्ट्रीय धनुर्धर जय ठेंबले यास आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक साधन सुविधा मिळण्याची मागणी थेट राज्याचे क्रीडा व युवककल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली. त्याची दखल घेत जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या सुविधा जय यांच्यासह खेळाडूंना देण्यात याव्या, अशा सूचना व यानंतर क्रीडा प्रशिक्षक, संघटक, खेळाडुंचे पालक, पंच, दिव्यांग खेळाडू आदी सर्वांच्या सूचना व मतं ऐकून घेत त्याचा अंतर्भाव राज्याच्या क्रीडा धोरणात करण्यात येईल, असा विश्वास स्वत: मंत्री देत असल्याचे चित्र आज विभागीय क्रीडा संकुलात बघायला मिळाले. औचित्य होते राज्यातील पहिल्या 'विकसित महाराष्ट्र २०४७- युवा व क्रीडा संवादाचे.'
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्यावतीने राज्याच्या क्रीडा क्षेत्र विकासासाठी महत्त्वपूर्ण सूचना प्राप्त करून घेण्याकरिता सर्व विभागीय मुख्यालयात 'विकसित महाराष्ट्र २०४७-युवा व क्रीडा संवाद' उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर विभागाचा हा संवाद विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे आयोजित करण्यात आला.
नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक, संघटक,पंच आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या संवादात हिरीरीने सहभाग घेऊन राज्याच्या क्रीडा धोरणासाठी आपल्या सूचना व मते थेट क्रीडा मंत्र्यांसमोर मांडल्या. विना मध्यंतर सलग चार तास चाललेल्या या संवादात शासन आणि लाभार्थी यांच्यातच थेट संवाद झाला. सुरुवातीला मंत्री ॲड. कोकाटे यांनी या उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करतांना क्रीडा व युवककल्याण क्षेत्रात कार्यरत सर्व घटकांच्या अमूल्य सूचना ऐकून घेत त्यातून राज्यासाठी एक सर्वसमावेशक धोरण ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
या संवादाची सुरुवातच गडचिरोली जिल्ह्यातील स्क्वॅश खेळाचे संघटक सरोजित मंडल यांनी खेळाडूंसाठी प्रवास व निवासी भत्त्यापोटी शासनाकडून वार्षिक निधी उपलब्ध होण्याबाबत केलेल्या सूचनेने झाली. याच जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी महिलांनी सुरु केलेल्या ‘आधार विश्व फाऊंडेशन’च्या प्रमुख गिता हिंगे यांनी तरुणांसाठी शासनाकडून समुपदेशनाची व्यवस्था उपलब्ध होण्याची मांडलेली सूचना, राज्यशासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त चंद्रपूर येथील ज्येष्ठ खेळाडू राजेश नायडू यांनी शिवछत्रपती पुरस्कार सुरु करण्याची केलेली सूचना, नागपूर येथील क्रीडा संघटक पियुष आंबुलकर यांनी विविध शासन निर्णयांचा संदर्भ देत विविध स्पर्धा आयोजनासाठी वाढीव निधी आणि प्रशिक्षक व क्रीडापटूंसाठी वाढीव मानधनाची केलेली सूचना तसेच आंतरराष्ट्रीय दिव्यांग क्रिकेटपटू गुरुदास राऊत यांनी दिव्यांग खेळाडुंसाठी विभागीय क्रीडा संकुलात दिव्यांग क्रीडा संकूल असावे आणि या खेळाडुंनाही शासकीय नोकऱ्या व पुरस्कारांमध्ये प्राधान्य देण्याची केलेली सूचना आणि यासर्वांना मंत्री ॲड. कोकाटे यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद व आश्वासनाने या संवादाचे लक्ष वेधून गेले. बहूतेक वेळी सूचनांना प्रतिसाद देतांना त्यांनी चार ते पाच विषयांमध्ये विभागाकडून लवकरच शासननिर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. क्रीडा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्याच्या रिक्त जागांबाबत बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण होताच जवळपास एक हजार पद भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी उद्योग क्षेत्राकडून सीएसआरमधून निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
प्रत्येक जिल्ह्यातील तीन ते चार प्रतिनिधींनी या संवादात सहभाग घेवून आपल्या सूचना व मत नोंदवली. नागपूर विभागापासून सुरु झालेला हा युवा व क्रीडा संवाद कार्यक्रम राज्यातील अन्य विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
राज्य शासनाच्या पहिल्या क्रीडा धोरणापासून ते राज्यातील क्रीडा प्रबोधिनी, क्रीडा संकूल, क्रीडा पुरस्कार, मिशन लक्षवेध आदींबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी प्रभारी क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक यांच्यासह विभागातील जिल्हा क्रीडा अधिकारी, आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू दिव्या देशमुख आणि विविध क्रीडा प्रकारातील निवडक आंतरराष्ट्रीय क्रीडापटू उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment